भोपाळ,
CBI Inquiry into the Twisha Sharma Case भोपाळमधील चर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासात पुरावे दडपले जात असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे निष्पक्ष तपास होणार नाही, अशी शंका व्यक्त करत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.मिळालेल्या माहितीनुसार, ट्विशाच्या सासरच्या मंडळीतील एका माजी जिल्हा न्यायाधीशांच्या प्रभावामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे देण्याचा निर्णय घेतला.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भोपाळ अर्बन परिसरातील कटारा हिल्स पोलीस ठाण्यात कथित हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता २०२३ मधील विविध कलमे तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सरकारने दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा १९४६ अंतर्गत सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आवश्यक अधिकार आणि अधिकारक्षेत्र दिले आहे. या तपासात केवळ मुख्य गुन्हाच नव्हे, तर त्यासंबंधित कट, प्रवृत्त करणे आणि इतर संबंधित बाबींचाही समावेश असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून आता सीबीआयकडून पुढील चौकशी केली जाणार आहे.