प्रत्यक्ष घरगणना सुरू : प्रगणकांना सहकार्य करा
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
यवतमाळ,
Census आगामी जनगणना 2027 ही देशातील सर्वात व्यापक व महत्त्वपूर्ण प्रशासनिक प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून जिल्ह्यात जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कार्यास दि. 16 मे पासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या टप्प्यामध्ये प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचारी दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घरभेटी देऊन माहिती संकलित करीत आहेत. घरगणनेदरम्यान प्रगणक घरांवर मार्कर किंवा खडूने क्रमांक चिन्हांकित करीत आहेत.
जनगणनेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, बँक खाते तपशील किंवा ओटीपी मागितला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शासनाने निश्चित केलेल्या 33 प्रश्नांचीच विचारणा करण्यात येणार आहे. जनगणना कार्य हे जनगणना अधिनियम, 1948 अंतर्गत केले जात असून प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांना घरांमध्ये प्रवेश करून माहिती घेण्याचा तसेच घरांना क्रमांक देण्याचा अधिकार आहे. जनगणनेत नोंदविण्यात येणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. जनगणना कर्तव्याचे पालन न करणे अथवा निष्काळजीपणा केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जनगणनेकरीता येणाèया प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्यक्ष जनगणनेच्या सुरुवातीला 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 22 हजार 318 कुटुंबांनी स्वगणना केली.
5600 अधिकारी, कर्मचारी ‘ऑन फिल्ड’
Census यवतमाळ जिल्ह्याच्या जनगणनेकरिता जिल्हाधिकारी प्रधान जनगणना अधिकारी असून निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हा जनगणना अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या जनगणनेकरिता साधारणत: 5 हजार 600 अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये 4638 प्रगणक, 779 पर्यवेक्षक, 2 जिल्हास्तरीय तर 92 क्षेत्रीय प्रशिक्षकांचा समावेश आहे.
2126 गावे तर 255 वार्डमध्ये जनगणना
जिल्ह्यात प्रत्यक्ष जनगणनेला सुरुवात झाली असून यामध्ये 700- 800 लोकसंख्येच्या प्रमाणात एक गट याप्रमाणे ग्रामीण व शहरी असे एकूण 5013 गट तयार झालेले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 2126 गावे आणि शहरी भागातील 255 वार्डांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.