धनादेश अनादरप्रकरणी आरोपीला एक महिन्याचा कारावास

    दिनांक :22-May-2026
Total Views |
वाशीम, 
Cheque Bounce Case मैत्रीपूर्ण संबंधातून घेतलेले हात उसने घेतलेले ३ लाख रुपये परत न केल्यामुळे झालेल्या वाद प्रकरणी वाशीम येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. यू. राजपूत यांनी आरोपीला दोषी ठरवत एक महिना साधा कारावास आणि ३ लाख १० हजार रुपयांची भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल २१ मे २०२६ रोजी दिला आहे. फिर्यादी रत्नाकर नारायण गंगावणे रा. देपूळ ता. वाशीम आणि आरोपी श्रीकृष्ण महादू लांभाडे रा. वारा जहागीर ता. वाशीम यांची ओळख होती. मे २०१८ मध्ये श्रीकृष्ण लांभाडे याला शेतीच्या कामासाठी ३ लाख रुपयांची गरज होती. मैत्रीपूर्ण नात्याचा विचार करून फिर्यादी रत्नाकर गंगावणे यांनी आरोपीला ३ लाख रुपये रोख हातउसनवार दिले. आरोपीने दोन महिन्यात रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते.
 

Cheque 
 
Cheque Bounce Case  मात्र, मुदत संपूनही पैसे परत न केल्याने फिर्यादीने तगादा लावला. त्यानंतर आरोपीने ३० जुलै २०१८ रोजी ३ लाख रुपयांचा धनादेश फिर्यादीला दिला. परंतु, हा धनादेश बँकेत सादर केला असता पुरेसे पैसे नसल्याने परत आला. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने फिर्यादीने कायदेशीर नोटीस पाठवली. याकडेही आरोपीने दुर्लक्ष केल्यामुळे फिर्यादीने न्यायालयात तक्रार दाखल केली. सुनावणीदरम्यान आरोपीने हा धनादेश नॉन-सीटीएस असल्याचे आणि सुरक्षेसाठी दिल्याचे बचावात्मक दावे केले. मात्र, पुराव्यांचे विश्लेषण करताना न्यायदंडाधिकारी डी. यू. राजपूत यांनी आरोपीचा बचाव फेटाळून लावला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, सीटीएस किंवा नॉन-सीटीएस असण्याने कर्जदाराची देयता संपत नाही. आरोपीने हेतुपुरस्सर रक्कम देण्याचे टाळल्याचे सिद्ध झाल्याने न्यायदंडाधिकारी डी. यू. राजपूत यांनी आरोपी श्रीकृष्ण महादू लांभाडे याला एन.आय. अ‍ॅट कलम १३८ अन्वये दोषी ठरवत एक महिना साधा कारावास आणि ३ लाख १० हजार रुपयांची भरपाई, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर आरोपीने दंडाची रक्कम भरली नाही, तर त्याला अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात फिर्यादीतर्फे अ‍ॅड. अमोल उर्फ गुड्डू सोमाणी यांनी काम पाहिले.