इंदूरमध्ये बालविवाह प्रकरण! १३ जणांवर गुन्हा दाखल

    दिनांक :22-May-2026
Total Views |
इंदूर,
child marriage case मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बालविवाह प्रकरण समोर आले आहे. राऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंगवासा गावात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे ४२ वर्षांच्या पुरुषाशी गुपचूप लग्न लावून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, महिला व बाल विकास विभागाच्या पथकाने हे लग्न आधीच थांबवले होते, तरीही कुटुंबीयांनी मुलीला उज्जैनला नेऊन गुपचूप लग्न लावल्याची माहिती समोर आली आहे.
 

child marriage case 
 
 
या प्रकरणाची सुरुवात गावात दोन सख्ख्या भावंडांच्या लग्नाची माहिती महिला व बाल विकास विभागाला मिळाल्यानंतर झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार फ्लाइंग स्क्वॉडने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान सादर करण्यात आलेली काही कागदपत्रे आणि गुणपत्रिका संशयास्पद आढळल्या. संबंधित शाळेकडून पडताळणी केल्यानंतर ही कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, दोन्ही मुले कधीही त्या शाळेत शिकले नसल्याचे उघड झाले.
प्रशासनाने रंगवासा गावात पोहोचून तातडीने कारवाई करत हे लग्न थांबवले होते. मात्र त्यानंतर कुटुंबीयांनी रातोरात मुलीला उज्जैन येथे नेऊन २६ एप्रिलच्या रात्री चिंतामणी गणेश मंदिराबाहेर गुपचूप लग्न लावून दिल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे.
प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, हे लग्न परस्पर देवाणघेवाणीतून ठरवण्यात आले होते. नातवाच्या लग्नाच्या बदल्यात अल्पवयीन मुलीचे ४२ वर्षीय पुरुषाशी लग्न लावल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात पोलिसांनी वर, वधूचे कुटुंबीय तसेच वराच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण १३ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.child marriage case सर्व आरोपींची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महिला व बाल विकास विभागाने हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, अल्पवयीन विवाहाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे.