नागपूर,
OBC column in the census देशात सुरू झालेल्या राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. यासंदर्भात महासंघातर्फे जिल्हाधिकारी, नागपूर यांना निवेदन देण्यात आले. जनगणना कार्यालयाने राजपत्राद्वारे जनगणनेची घोषणा केली. मात्र, या प्रक्रियेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांची माहिती विचारली जात असताना ओबीसी समाजाचा स्वतंत्र कॉलम नसल्याने समाजात नाराजी व संभ्रम निर्माण झाल्याचे महासंघाने म्हटले आहे.
मागील अनेक वर्षांपासून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात असून, १९३१ च्या जनगणनेतील आकडेवारीवरच आजही अवलंबून राहावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. OBC column in the census ओबीसी महासंघाने इशारा दिला आहे की, जनगणनेत ओबीसी कॉलम समाविष्ट न केल्यास हा ओबीसी समाजावर अन्याय व विश्वासघात ठरेल. तसेच येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रसंगी महासंघाचे केंद्रीय सचिव शरद वानखेडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तर शहराध्यक्ष परमेश्वर राऊत यांनी लवकर निर्णय न झाल्यास नागपूरमध्ये चौकाचौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला. या वेळी नगरसेवक शकील पटेल, दिनेश यादव, सुभाष घाटे, नरेश बरडे, बाबा ढोबळे, गणेश गडेकर, विनोद इंगोले, अविनाश घागरे, सुधाकर तायवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सौजन्य: परमेश्वर राऊत, संपर्क मित्र