मुंबई
Deool Band 2 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञान यातील संघर्षावर आधारित कथानकामुळे मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. आता तब्बल 11 वर्षांनंतर त्याचा बहुचर्चित सिक्वेल ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळवत दमदार सुरुवात केली आहे. २१ तारखेला विशेष शो ठेण्यात आला.
या अनोख्या प्रयोगामुळे पहाटेच्या शोसाठीही थिएटरमध्ये प्रेक्षकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, जळगाव, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या सर्व भागांतील चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी अनेक शो हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसून आले.
मुंबईतील भांडुप, Deool Band 2 कल्याण, नालासोपारा, अंधेरी, ठाणे आणि लोअर परळ परिसरातही चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक मल्टिप्लेक्समध्ये शो हाऊसफुल्ल झाल्याने तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मवर मोठी मागणी निर्माण झाली. ‘बुक माय शो’वर तिकिटांसाठी प्रेक्षकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले.सोशल मीडियावरही ‘देऊळ बंद 2’ची जोरदार चर्चा रंगली असून प्रेक्षकांनी चित्रपटातील संवाद, कथानक, भावनिक प्रसंग, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. विशेषतः चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि संवाद प्रवीण तरडे यांनी सांभाळले असून त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे कथानक अधिक परिणामकारक ठरल्याचे मत प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसत असून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळत आहे. त्यांच्या संवादफेकीतील भारदस्तपणा आणि भावनिक सादरीकरणामुळे चित्रपटातील श्रद्धेचा भाग अधिक प्रभावी झाल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहे.पहिल्याच दिवशी राज्यभरात सुमारे 500 सिनेमागृहांमध्ये 2000 हून अधिक शो प्रदर्शित झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्येच अनेक शो हाऊसफुल्ल झाल्याने हा प्रतिसाद विक्रमी मानला जात आहे. मराठी चित्रपटासाठी मिळालेली ही ओपनिंग कामगिरी वर्षातील सर्वात मोठ्या यशांपैकी एक ठरू शकते, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू झाली आहे.दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मुहूर्त आणि प्रयोगात्मक रिलीजच्या धर्तीवर या चित्रपटाचा ब्रह्ममुहूर्तावर केलेला विशेष प्रदर्शन प्रयोगही यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. प्रेक्षकांनी या वेगळ्या सादरीकरणालाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ‘देऊळ बंद 2’ने मराठी चित्रपटसृष्टीत दमदार ओपनिंगची नोंद केली आहे.