पात्र मतदाराचे नाव वगळणार नाही!

निवडणूक आयोगाचे स्पष्ट आश्वासन

    दिनांक :22-May-2026
Total Views |
मुंबई,
Election Commission's Assurance राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव विनाकारण यादीतून वगळले जाणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले आहे.राज्यात राबवण्यात येणारी एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असे सांगताना त्यांनी नागरिकांना २००२ सालच्या मतदार यादीशी आपले किंवा आपल्या पालकांचे नाव जुळते का, हे तपासण्याचे आवाहन केले. जुन्या नोंदी आणि सध्याच्या माहितीत मॅपिंग करून मतदारांची अचूक माहिती अद्ययावत केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
Election Yadi
 
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत राज्यातील जवळपास ९ कोटी ८६ लाख मतदारांची प्रत्यक्ष घरभेटीद्वारे पडताळणी केली जाणार आहे. यासाठी राज्यभरात एक लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्स अर्थात बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. ३० जूनपासून बीएलओ कर्मचारी घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासणार, अर्ज वितरित करणार आणि भरलेले अर्ज स्वीकारणार आहेत. नागरिक घरी उपस्थित नसल्यास त्यांना नंतरही आपली नोंदणी किंवा माहिती दुरुस्तीची संधी दिली जाणार असल्याचे चोकलिंगम यांनी सांगितले. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये पुनर्विकासामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी स्थानिक बीएलओशी संपर्क साधून आवश्यक माहिती आणि फॉर्म सादर करावेत, असे आवाहन आयोगाने केले आहे. तसेच प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ‘ऑनलाइन सेल्फ मॅपिंग’ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आपली माहिती अपडेट करता येणार आहे.
 
 
पात्र मतदारावर अन्याय नाही
या मोहिमेदरम्यान डुप्लिकेट नावे शोधणे, स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे आणि जुन्या मतदार याद्यांशी तपशील जुळवणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांना पडताळणीदरम्यान अधिकृत कागदपत्रे सादर करण्याची संपूर्ण संधी दिली जाईल, त्यामुळे कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ऑगस्ट महिन्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर नागरिकांना हरकती आणि दावे नोंदवण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.