नवी दिल्ली,
Fine Imposed on Ruturaj After Defeat इंडियन प्रीमियर लीग २०२६ मधील चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास अखेर निराशाजनक पद्धतीने संपला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला तब्बल ८९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या मोठ्या पराभवानंतर पाच वेळच्या विजेत्या चेन्नईचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अधिकृतपणे भंगले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने सर्वच विभागांत वर्चस्व गाजवले. धावांच्या फरकाने पाहता, हा चेन्नईचा या हंगामातील सर्वात मोठा पराभव ठरला. चेन्नईने यंदाच्या लीग टप्प्यातील १४ सामने खेळले, त्यापैकी केवळ सहा सामन्यांत विजय मिळवता आला, तर आठ सामन्यांत संघाला पराभव पत्करावा लागला.

सामना संपल्यानंतर चेन्नईला आणखी एक मोठा धक्का बसला. संथ गतीने षटके टाकल्याप्रकरणी बीसीसीआयने संघाचा कर्णधारऋतुराज गायकवाड याच्यावर २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय प्लेइंग इलेव्हनमधील इतर खेळाडू आणि इम्पॅक्ट प्लेयर्सनाही दंड करण्यात आला आहे. प्रत्येक खेळाडूला ६ लाख रुपये किंवा सामन्याच्या फीच्या २५ टक्के रक्कम, यापैकी जी कमी असेल ती भरावी लागणार आहे.
बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, या हंगामात चेन्नईकडून संथ षटकगतीचे हे दुसरे उल्लंघन झाले आहे. यापूर्वीही संघावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आधीच खराब कामगिरीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या चेन्नईसाठी हा हंगाम अनेक अडचणींनी भरलेला ठरला. संघातील काही महत्त्वाचे खेळाडू दुखापतींनी त्रस्त होते, तर मैदानावरील कामगिरीतही सातत्य दिसले नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात चेन्नईला अपेक्षित यश मिळवता आले नाही.