५ बकर्या, १० कोंबड्या ठार
तिवसा,
Fire in the barn on the farm तिवसा शहरालगत असलेल्या आनंदवाडी परिसरात शुक्रवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आनंदवाडी जिनिंगला लागून असलेल्या मिथुन देशमुख यांच्या शेतातील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत पाच बकर्या व दहा कोंबड्या जळून मृत्यूमुखी पडल्या, तर शेतीसाठी वापरण्यात येणारे महत्त्वाचे साहित्य, स्प्रिंकलर संच व टिनपत्रे पूर्णतः जळून खाक झाले. या आगीत अंदाजे एक लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ४:३० वाजताच्या सुमारास मिथुन देशमुख यांच्या शेतातील कोठ्याला अचानक आग लागली. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण गोठा वेढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भीषण आगीत गोठ्यात बांधलेल्या पाच बकर्या व दहा कोंबड्या जळून मृत्यूमुखी पडल्या. तसेच दोन स्प्रिंकलर संच, सुमारे पस्तीस टिनपत्रे, शेतीसाठी लागणारे साहित्य, चारा व अन्य वस्तू जळून खाक झाल्या. बचावकार्य दरम्यान एक गाय व एक वासरू सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
Fire in the barn on the farm घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे विजय यावले, राहूल असोडे, अंकित माहोरे तसेच वाहन चालक वैभव बोकडे यांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे आग आणखी पसरण्यापासून रोखण्यात यश आले. दरम्यान, संबंधित घटनेची माहिती मिळताच तिवसा मंडळ अधिकारी चंद्रशेखर आगरकर, तलाठी वैभव देशमुख तसेच कोतवाल अजय खाकसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अचानक लागलेल्या या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शेतकरी मिथुन देशमुख यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकर्यासह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.