सिंदेवाही,
Four women killed in Sindewahi tiger attack चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाची भीषण घटना समोर आली आहे. गुंजेवाही परिसरालगतच्या खैरी शिवारातील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुंजेवाही येथील काही महिला शुक्रवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. जंगलातील खैरी शिवार परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. हल्ला इतका भीषण होता की, चारही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये कवडूबाई दादाजी मोहुर्ले-45, अनुबाई दादाजी मोहुर्ले-46, संगीता संतोष चौधरी-36, सुनीता कौशिक मोहुर्ले-33 यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. वन विभाग, पोलीस प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून, परिसरात शोधमोहीम व पंचनामा सुरू करण्यात आला आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने विशेष पथके तैनात केली आहेत. दरवर्षी तेंदूपत्ता हंगाम सुरू झाला की हजारो आदिवासी व गरीब कुटुंबातील महिला-पुरुष आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलात जात असतात. मात्र, वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे आता जंगलात जाणे जीवावर बेतू लागले आहे. “घर चालवण्यासाठी जंगलात जावे लागते, पण परत सुखरूप येऊ की नाही याची खात्री राहिलेली नाही,” अशी संतप्त भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात मानव-व्याघ्र संघर्षाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण असून, शेतकरी, मजूर आणि जंगलावर अवलंबून असलेले नागरिक सतत भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. वन विभाग आणि शासनाकडून केवळ बैठका व घोषणाच केल्या जातात, मात्र प्रत्यक्ष उपाययोजना अपुऱ्या असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या घटनेनंतर गुंजेवाही तसेच आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली असून, मृत महिलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करावी तसेच जंगल परिसरात सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.