हत्तीवरील भव्य मिरवणुकीने हदगाव नगरी भक्तीमय

    दिनांक :22-May-2026
Total Views |
चतुर्थ पट्टाभिषेक वर्धापनदिन सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हदगाव, 
Hadgaon: Procession on an Elephant महादेव मठ संस्थानतर्फे आयोजित तीन दिवसीय नामसंकीर्तन, चतुर्थ पट्टाभिषेक वर्धापनदिन सोहळा तथा अधिक मासानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना हदगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 108 सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या हत्तीवरील भव्य मिरवणुकीने संपूर्ण हदगावनगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली. ढोल-ताशांचा गजर, विविध धार्मिक घोषणांनी दुमदुमलेले रस्ते, भाविकांची प्रचंड गर्दी आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा हा सोहळा नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
 
 
y22May-Hadgav-(2)
 
मिरवणुकीत कर्नाटकातील कलबुर्गा येथून आलेल्या श्रीवीर मंडळांनी वीरभद्र महाराजांचे थरारक आणि आकर्षक देखावे सादर केले. दारव्हा येथील हरिपाठ मंडळाने विविध भक्तीगीते आणि सामाजिक संदेशपर गाणी सादर करून सर्वधर्मसमभाव, एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. महादेव मठ ते कस्तुरी देशमुख मंगल कार्यालयातील अनुभव मंडपापर्यंत मिरवणूक पोहोचल्यानंतर गुरुमाऊलींचे प्रेरणास्थान असलेल्या साखर खेडेकर बाबांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची एमपीएससी व यूपीएससीच्या पुस्तकांनी ग्रंथतुला करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयएएस, आयपीएस तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
 
 
Hadgaon: Procession on an Elephant  यावेळी योगीराज बापू यांनी, ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अशा ग्रंथतुलेचा मोठा फायदा होणार असून हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षस्थान 108 सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनी भूषविले. दोन्ही दिवशी हजारो भाविकांनी ज्ञानप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.