उन्हाचा तडाखा अन् पावसाच्या सरी!

    दिनांक :22-May-2026
Total Views |
मुंबई,
heat and showers of rain राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच आता हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
 
heat and showers of rain
एकीकडे काही भागांत पावसाचे वातावरण तयार होत असताना दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून उकाड्याची तीव्रता वाढली आहे.याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भातील इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.