उष्णतेत भारत जगातील ‘हॉटस्पॉट!

१०० सर्वात उष्ण शहरांत ९७ भारतीय

    दिनांक :22-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India: A Global Hotspot for Heat देशभरात उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले असून शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जगातील १०० सर्वात उष्ण शहरांपैकी तब्बल ९७ शहरे भारतात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात तापमानाने अक्षरशः कहर केला असून अनेक ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. ओडिशातील बलांगीर येथे ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ते देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. त्यानंतर बिहारमधील सासाराम आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी येथेही अनुक्रमे ४८ आणि ४७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. या तीव्र उष्णतेमुळे सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
 
 
India Hotspot for Heat
 
अनेक शहर ४५ अंशांच्यावर
भारतासोबतच नेपाळमधील काही शहरांनीही या यादीत स्थान मिळवले आहे. धनगढी, नेपाळगंज आणि लुंबिनी कल्चरल या शहरांमध्ये तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले गेले आहे. मात्र, यादीतील बहुतांश शहरांवर भारताचे वर्चस्व दिसून आले आहे.देशातील अनेक शहरांमध्येही उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. मुझफ्फरनगर, अयोध्या, हरिद्वार, आग्रा, चंदीगड, ग्वाल्हेर, वारंगल आणि भरतपूर यांसारख्या शहरांमध्ये तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
 
 

उष्माघाताचे प्रमाण वाढले
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यविषयक समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये उष्माघाताशी संबंधित सुमारे ३०० हून अधिक संशयित प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मार्चपासून मेपर्यंत ही प्रकरणे वाढत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.तज्ज्ञांच्या मते, उष्माघात ही गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असून शरीरातील तापमान वाढल्याने ती जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना दुपारी ११ ते ४ या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवसांत दिल्लीसह उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी निर्जलीकरण आणि उष्णतेशी संबंधित आजारांमुळे रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. काही भागांमध्ये पाणीटंचाईची समस्याही गंभीर होत असल्याचे चित्र आहे.