नवी दिल्ली,
indian navy future plan नवी दिल्लीमध्ये भारतीय नौदलाने समुद्री सुरक्षेसंदर्भात मोठी आणि महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. वाढत्या सामरिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आणि विशेषतः इंडो-पॅसिफिक प्रदेशातील परिस्थिती लक्षात घेता, नौदलाने पुढील काही वर्षांत आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नौदलाच्या उपप्रमुखांनी पुढील तीन ते चार वर्षांसाठी तसेच दीर्घकालीन योजनांची माहिती जाहीर केली असून, त्यातून भारताची सागरी शक्ती अधिक मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
या योजनेनुसार पुढील तीन ते चार वर्षांत सुमारे ४५ स्वदेशी युद्धनौका तयार करून संवेदनशील सागरी भागांमध्ये तैनात केल्या जाणार आहेत. कोलकाता येथे ‘नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स’ (NGOPVs) मालिकेतील पहिल्या जहाजाच्या जलावतरण कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. नौदलाला ‘फ्युचर शिप्स प्रोग्राम’ अंतर्गत १९५ नौदल जहाजांसाठी तत्त्वतः मंजुरी मिळाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय ६९ नवीन जहाजे, ६ पाणबुड्या आणि १२० वेगवान इंटरसेप्टर जहाजांच्या निर्मितीलाही मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे भारतीय नौदलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे समुद्री सीमांचे अधिक प्रभावी संरक्षण शक्य होणार आहे.
नौदलाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १४० जहाजे ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत आणि २०३० पर्यंत ही संख्या १५५ ते १६० पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर २०३५ पर्यंत भारतीय नौदलाचा ताफा २०० युद्धनौका आणि पाणबुड्यांपर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे.
ही संपूर्ण रणनीती वाढत्या सामरिक आव्हानांना, विशेषतः समुद्री घुसखोरी आणि प्रादेशिक तणावांना उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. नौदलाने उपग्रह प्रणाली, टेहळणी विमाने, युद्धनौका आणि पाण्याखालील सेन्सर्स यांच्या मदतीने एक मजबूत सागरी सुरक्षा जाळे उभारण्यावर भर दिला आहे.
या कार्यक्रमात सादर करण्यात आलेले ‘संघमित्र’ हे अत्याधुनिक ऑफशोर पेट्रोल व्हेसल असून ते सागरी गस्त, किनारी सुरक्षा, शोधमोहीम आणि जप्ती कारवायांसाठी सक्षम आहे.indian navy future plan सुमारे ११३ मीटर लांबीचे आणि ३,००० टन विस्थापन क्षमतेचे हे जहाज लांब पल्ल्याच्या मोहिमा पार पाडू शकते. त्याची गती, टिकाऊपणा आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतीय नौदलाची किनारी सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.या घोषणेमुळे भारतीय नौदल भविष्यातील समुद्री आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक सज्ज होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.