पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजीत भालेराव

    दिनांक :22-May-2026
Total Views |
‘शोध — कृषी संस्कृतीचा’ विषयावर व्याख्यान
 
वाशीम, 
माणसाने प्राण्यांची शिकार करून खाण्याऐवजी पेरून खाण्याची सुरुवात केली, तिथूनच खर्‍या अर्थाने मानवी संस्कृती आणि शेती संस्कृतीचा उदय झाला, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, साहित्यिक व विचारवंत Indrajit Bhalerao प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी केले. वाशीम जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी वृंदातर्फे आयोजित ‘वाशीम वासंतिक व्याख्यानमाला’ अंतर्गत दुसर्‍या पुष्पाचे व्याख्यान बुधवारी २१ मे रोजी उत्साहात पार पडले. स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र (आत्मा), काटा चौफुली, येथे आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री ना.च.कांबळे, बाबाराव मुसळे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय रणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी एस ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
bhalerao
 
‘शोध — कृषी संस्कृतीचा’ या विषयावर बोलताना प्रा. भालेराव यांनी प्राचीन लोकपरंपरा, वेदकालीन संस्कृती, रामायण-महाभारतकालीन कृषी व्यवस्था तसेच संत साहित्य आणि कृषीविषयक ग्रंथांच्या आधारे शेती संस्कृतीचा समृद्ध इतिहास उलगडून सांगितला. व्याख्यानादरम्यान त्यांनी पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचारांचा संदर्भ देत शेतीच्या प्रारंभाचा इतिहास स्पष्ट केला. त्रिशूलाचे तिफणीत झालेले रूपांतर, बसव्या बैलाची लोकपरंपरा आणि शेतीसाठी पशूंचा उपयोग याविषयी त्यांनी रंजक माहिती दिली. तसेच कॉ. शरद पाटील यांच्या ‘वेदातील शेतीचा शोध’ या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी ‘तंत्र’ म्हणजे शेती आणि ‘वेद’ म्हणजे ज्ञान यांचा संबंध अधोरेखित केला.
 
 
 
प्राचीन काळातील सामूहिक शेती, ‘सीता’ म्हणजे न नांगरलेली जमीन आणि ‘उर्वरा’ म्हणजे नांगरलेली जमीन या शेती प्रकारांची माहिती देतानाच ‘वाफ धावण’ या कृषीपरंपरेचाही त्यांनी उल्लेख केला. महाभारतकालीन कृषी व्यवस्थेचा संदर्भ देताना शेतकरी वर्गासाठी असलेली कर्जव्यवस्था, करपद्धती आणि शेतीचे विविध प्रकार यांचे विवेचन त्यांनी केले. देव मातृक, नदी मातृक आणि प्रकृती मातृक अशा शेतीच्या प्रकारांचेही त्यांनी सविस्तर वर्णन केले.कृषी पराशर आणि कश्यप ऋषींच्या ग्रंथांतील संदर्भ देत त्यांनी जलव्यवस्थापन, संतुलित आहार आणि शेतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला.
 
 
Indrajit Bhalerao  दक्षिण भारतातील संत तिरुवल्लुवर यांच्या ‘कुराळ’ या ग्रंथाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना शेती करणे अवघड झाले, तर जगाला जगणे अवघड होईल, हा संदेश आजही अत्यंत समर्पक आहे. साने गुरुजी यांनी या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केल्याची माहितीही त्यांनी दिली.पशुसंवर्धन, गोवंश व्यवस्थापन, बौद्धकालीन शेती, सम्राट अशोकाच्या काळातील सिंचन व्यवस्था आणि ‘हलोस्तव’ या कृषी उत्सवाबाबतही त्यांनी माहिती दिली. तसेच ‘गाथासप्तशती’, ज्ञानेश्वरी, संत एकनाथांचे भागवत आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमधून व्यक्त झालेल्या शेती संस्कृतीचे प्रभावी संदर्भ त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले. प्रा. भालेराव यांच्या अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि प्रभावी शैलीतील व्याख्यानाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.