'हायप्रोफाईल' पालकांभोवती चौकशीचा 'नीट' फास

सीबीआयचा तपास वेगात

    दिनांक :22-May-2026
Total Views |
मुंबई,
Interrogation of High-Profile Parents नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्राशी जोडले जात असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. सीबीआयच्या तपासानुसार, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये नीट प्रश्नपत्रिकेच्या प्रिंट काढून त्यांची विक्री झाल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. सीबीआयच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, या संपूर्ण प्रकरणाचे सर्वात मोठे केंद्र महाराष्ट्र असल्याचे दिसत आहे. येथूनच प्रश्नपत्रिका राजस्थानसह इतर राज्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्याचा संशय आहे. या व्यवहारांमध्ये मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावेही तपास यंत्रणांना मिळाले असून, काही हायप्रोफाईल पालकही आता रडारवर आले आहेत. तपास यंत्रणा अशा पालकांची यादी तयार करत असून त्यांच्या बँक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे.
 
 
neet
 
 
तीन डॉक्टर चौकशीच्या घेऱ्यात
या प्रकरणामुळे केवळ परीक्षा गैरव्यवहारच नव्हे तर एक मोठे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या प्रकरणात काही नातेवाईक आणि मध्यस्थांनी प्रश्नपत्रिका पुढे इतरांना विकल्याचे समोर आले आहे. मात्र किती विद्यार्थ्यांपर्यंत ही प्रश्नपत्रिका पोहोचली याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, हे अजूनही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. दरम्यान, लातूरमध्ये या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र झाला आहे. एका बीएएमएस डॉक्टरच्या हॉस्पिटलवर सीबीआयने छापा टाकत कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. याआधी दोन डॉक्टरांची चौकशी झाल्यानंतर आता तिसऱ्या डॉक्टरकडेही तपास पोहोचला आहे.
 
 
 
अनेक राज्यांपर्यंत पेपरफुटीचे कनेक्शन
या घडामोडींमुळे लातूर कनेक्शन अधिक गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे स्पष्ट होत आहे.तपासादरम्यान अटक झालेल्या एका बालरोगतज्ज्ञावरही प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशय आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि परीक्षेपूर्वी झालेल्या हालचालींची सखोल चौकशी सुरू आहे. अंबाजोगाई आणि परभणी परिसरातही काही विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यांना पुढील तपासासाठी लातूरला हलवण्यात आल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नीट पेपरफुटी केवळ एका राज्यापुरती मर्यादित नसून, अनेक राज्यांपर्यंत पसरलेले एक मोठे रॅकेट असल्याचे संकेत मिळत आहेत. सीबीआयकडून लवकरच आणखी छापेमारी आणि अटकसत्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.