वर्धा,
Kidnapping of a Child घराच्या अंगणात खेळत असलेल्या बालकाचे अपहरण करून त्यास पुलगाव येथे नेत त्याच्याकडून टरबूज विक्रीचे काम करून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भिडी येथील चंद्रशेखर नागपुरे यांचा ९ वर्षीय भाचा १८ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. दरम्यान तो बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेतला. चौकशीदरम्यान, टरबूज विक्रेता अक्षय झोरे हा मुलाला आपल्या सोबत घेऊन गेल्याची माहिती समोर आली.
Kidnapping of a Child चंद्रशेखर नागपुरे यांनी अक्षय झोरे याच्याशी फोनवर संपर्क साधला असता तुझा भाचा माझ्याकडे आहे उद्या परत आणतो असे त्याने सांगितले. यानंतर चंद्रशेखर नागपुरे हे देवळी येथे अक्षय झोरेच्या घरी गेले असता त्यांचा भाचा तेथे आढळून आला. अक्षय झोरे याने त्याला जबरदस्तीने पुलगाव बाजारात टरबूज विक्रीच्या कामासाठी नेले होते आणि नंतर घरी ठेवले होते. चंद्रशेखर नागपुरे यांनी मुलाला ताब्यात घेऊन भिडी येथे आणले. मात्र, तेथे आल्यानंतर मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला प्रथम भिडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. यानंतर चंद्रशेखर नागपुरे यांनी देवळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार संदीप कापडे यांनी कारवाई करत अक्षय झोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.