लिटील टर्नच्या प्रजननाने वेधले पक्षी अभ्यासकांचे लक्ष

    दिनांक :22-May-2026
Total Views |
यवतमाळ, 
Little Tern: Rare Waterbird यवतमाळजवळील निळोणा धरण हे स्थलांतरित जलपक्ष्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण म्हणून पुढे येत आहे. उथळ पाणी, नैसर्गिक बेटं, चिखलयुक्त किनारे आणि मुबलक जलचर जीवसृष्टीमुळे हे धरण अनेक पाणपक्ष्यांना आकर्षित करीत आहे. मात्र, सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनियंत्रित माती उत्खननामुळे या नाजूक नैसर्गिक परिसराला गंभीर धोका निर्माण झाला आहे. जिकडे नजर जाईल व जिथे सोयीस्कर जागा मिळेल त्या ठिकाणी उत्खनन सुरू असल्याने धरण परिसरातील पक्ष्यांची सुरक्षित ठिकाणे झपाट्याने कमी होत आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी एका अतिशय लहान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणपक्ष्यांचे प्रजनन आढळून आल्याने पक्षी अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले आहे.
 
 
y22May-Little-Turn
 
 
विशेष म्हणजे, युरोप, मध्य आशिया आणि आफ्रिका खंडातून स्थलांतर करून येणारा Little Tern: Rare Waterbird लिटील टर्न हा दुर्मीळ जलपक्षी निळोणा येथे मोठ्या संख्येने अंडी घालताना आढळला आहे. अमोलकचंद महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख व पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण जोशी यांनी नियमित निरीक्षणादरम्यान धरणातील एका सुरक्षित बेटावर तब्बल 12 घरटी, ज्यामध्ये दोन किवा तीन अंडी असल्याची नोंद घेतली. यासोबतच ब्लॅक विंग्ड स्टिल्ट या पक्ष्याची दोन, तर रेड-वॉटल्ड लॅपविंग या पक्ष्याचे एक घरटेही आढळले आहे.
 
 
Little Tern: Rare Waterbird डॉ. जोशी यांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये लिटील टर्न अंडी उबविताना स्पष्ट दिसत असून, हा परिसर पक्ष्यांच्या प्रजननासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे दिसून येते. उथळ पाणी, सुरक्षित टापू, उघडे किनारे आणि लहान माशांची उपलब्धता यामुळे या पक्ष्यांनी निळोणा धरणाची निवड केली असावी. विशेषतः पाणपक्षी उन्हाळ्यात धरण परिसरातील उघड्या जागांवर अंडी घालत असल्याने वाढते उत्खनन त्यांच्या प्रजनन क्षेत्राला असुरक्षित व मर्यादित बनवत आहे. निळोणा येथे स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रजनन होणे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे.

प्रशासनाने लक्ष घालावे
प्रशासनाने पुढाकार घेऊन या क्षेत्राला काही काळ संरक्षण दिल्यास या परदेशी पाहुण्यांचे प्रजनन सुरक्षित होऊ शकते. निळोणा धरण हा केवळ जलसाठा नसून पक्षी संवर्धनासाठी महत्त्वाचे नैसर्गिक ठिकाण ठरत असून, या संवेदनशील परिसराच्या संरक्षणाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
प्रा. डॉ. प्रवीण जोशी
प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ