छत्रपतीसंभाजीनगर
Prasad Lad मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर तोडगा न निघाल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेत 30 मे रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज अंतरवाली सराटीत भेट देत जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यांनी स्वतःला जरांगे पाटलांचा “लहान भाऊ” मानत ही भेट वैयक्तिक असल्याचे सांगितले. जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी बोलताना लाड यांनी मराठा आरक्षणाच्या स्थितीबाबत मोठे विधान करत “हत्ती गेला आणि शेपूट राहिले आहे” असे म्हणत आरक्षण प्रक्रियेत काही मुद्दे अजूनही प्रलंबित असल्याचे सूचित केले. त्यांनी सरकार आणि उपसमितीशी समन्वय साधून उर्वरित मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
लाड यांनी असेही Prasad Lad म्हटले की जरांगे पाटील यांच्या सात ते आठ प्रमुख मागण्या असून त्या समजून घेऊन त्यावर पुढील कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल. काही मागण्यांमध्ये कायदेशीर अडचणी असू शकतात, तर काही बाबी प्रशासनिक पाठपुराव्याशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मागण्या पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी पुढे असेही नमूद केले की, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी पूर्वीच व्यक्त केली आहे.दरम्यान, त्यांनी जरांगे पाटील यांना आमरण उपोषण टाळावे असे आवाहन करताना उन्हाळ्याची परिस्थिती, शेतीची कामे आणि शाळा सुरू होण्याचा कालावधी याचा उल्लेख केला. उपोषणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आंदोलनाचा मार्ग टाळावा, असेही ते म्हणाले.
याच वेळी त्यांनी प्राध्यापक हाके Prasad Lad यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत या प्रकरणात अनावश्यक प्रतिक्रिया देऊ नयेत, असे सूचक वक्तव्य केले. अंतरवाली सराटी हे मराठा समाजाच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.एकूणच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सरकार, आंदोलनकर्ते आणि राजकीय नेते यांच्यात चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.