मेट्रोच्या सीसीटीव्ही प्रणालीमुळे चोरांचा शोध

    दिनांक :22-May-2026
Total Views |
पोलिसांना मोठी मदत

नागपूर, 
Metro CCTV मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एमआयडीसी परिसरातील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे ४० लाख किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरीस गेले होते. महा मेट्रो नागपूरच्या सिक्युरिटी कंट्रोल एसजी रवी धांडे यांनी आपल्या तांत्रिक अनुभवाच्या आधारे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाला महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली. त्यांच्या सहकार्यामुळे चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
 
 
metro-one
नागपूर रेल्वे स्थानकावर १३ फेब्रुवारी रोजी एका प्रवाशाचे पर्स दुसर्‍या प्रवाशाने घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात संशयित व्यक्ती बन्सी नगर मेट्रो स्थानकावर उतरल्याचे दिसून आले. प्रवाशासोबत शोधमोहीम राबवून संशयितास बन्सी नगर मेट्रो स्थानकाजवळ शोधण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपली चूक कबूल केली आणि १५,५०० रोख रक्कम असलेले पर्स संबंधित प्रवाशाला परत केले.
एका महिला प्रवाशाच्या सुमारे ३,८०,००० रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या सिताबर्डी मेट्रो स्थानकावर होत्या. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका प्रवाशाने त्या उचलल्याचे निदर्शनास आले. संबंधित नियमित मेट्रो प्रवासी असल्याचे आढळून आले. संपर्क साधल्यानंतर त्याने बांगड्या घेतल्याची कबुली दिली. आणि त्या परत करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर त्याने बांगड्या संबंधित महिलेला परत सुपूर्द केल्या.
 
Metro CCTV  नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाल्यापासून सीसीटीव्ही प्रणाली ही गुन्हे उघड आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह साधन ठरली आहे. याशिवाय, तिकीट काउंटर, किंवा मेट्रो ट्रेनमध्ये विसरलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोधून त्यांना परत करण्यात येतात, ज्यामुळे प्रवाशांच्या चेहर्‍यावर पुन्हा आनंद फुलतो.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने व्यक्तींची ओळख
कधीकधी इतर प्रवासी चुकून मागे राहिलेल्या वस्तू घेऊन जातात. अशा परिस्थितीत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यात येतो. वस्तू मालकाला परत करण्यात येतात. तसेच, पार्किंग परिसरातून चोरीस गेलेल्या वाहनांच्या शोधात आणि संशयित आरोपींना अटक करण्यातही सीसीटीव्ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरली आहे. इतकेच नव्हे, तर महा मेट्रो नागपूरने हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र आणण्यातही यश मिळवले आहे. मेट्रो स्थानकांवर हरवलेल्या मुलांच्या शोध सीसीटीव्ही प्रणालीच्या मदतीने घेण्यात येतो आणि मुलांना त्यांच्या स्वाधीन करण्यात येते.

अनेक संशयितांची ओळख
मेट्रो परिसरात तसेच शहरातील इतर भागांत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक संशयितांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तपास प्रक्रियेस मदत व्हावी आणि आरोपींना तातडीने अटक करता यावी यासाठी पोलिसांना आवश्यक सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यात येते