नवेगावबांधच्या नौकाविहाराला पर्यटकांची पसंती

    दिनांक :22-May-2026
Total Views |
- पर्यटनाला मिळाली नवसंजीवनी; स्थानिक व्यवसायांना लाभ

अर्जुनी मोरगाव, 
निसर्गरम्य नवेगावबांध येथील निसर्गरम्य तलावामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या Navegaonbandh Boating Project नौकाविहार प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबवून एस. के. इन्फ्रा कंपनीला पाच वर्षांसाठी या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले असून तीन हजार एकर परिसरात पसरलेल्या नवेगाव बांध तलावातील पाच एकर क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेला हा नौकाविहार प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सुरक्षित व निसर्गरम्य वातावरणात बोटींगचा आनंद घेण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच परिसरातील मोठ्या संख्येने पर्यटक नवेगाव बांधकडे आकर्षित होत आहेत.
 
 
nave
 
Navegaonbandh Boating Project  गेल्या महिन्यात 8 एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. दरम्यान, दरदिवशी उन्हाळ्याच्या कडक उन्हाची पर्वा न करता पर्यटक मोठ्या उत्साहाने येथे भेट देत असल्याचे दिसून येत आहे. नियमित पर्यटनामध्ये तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. नौकाविहार प्रकल्पामुळे फक्त बोटींग व्यवसायालाच चालना मिळाली नसून स्थानिक हॉटेल व्यवसाय, निवास व्यवस्था, छोटे-मोठे दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच इतर व्यवसायांनाही मोठा फायदा होत आहे. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकही आपल्या कुटुंबीयांसह नौकाविहाराचा आनंद घेत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नवेगावबांध व नागझिरा राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे जंगल सफारीलाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम स्थानिक रोजगार निर्मितीवर होत असून युवकांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.