नवी दिल्ली
NEET वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा (NEET 2026) पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपांमुळे देशभरात चर्चेत आली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत परीक्षा रद्द केली असून तपासाची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) च्या प्रमुखांनी संसदीय समितीसमोर केलेल्या दाव्यांमुळे गोंधळ अधिक वाढला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने अनेक जणांना अटक केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील काही व्यक्तींचाही समावेश आहे. आरसीसीचे संचालक मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी आणि मनिषा मांढरे यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांकडून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिका हाताळणीतील त्रुटी आणि संगनमताच्या शक्यता यांचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, संसदीय स्थायी समितीसमोर हजर राहिलेले NTA प्रमुख अभिषेक सिंह यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, NEET 2026 ची संपूर्ण प्रश्नपत्रिका लीक झालेली नव्हती, मात्र परीक्षेतील काही प्रश्न मात्र बाहेर फुटल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय याच पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.
अभिषेक सिंह यांनी पुढे NEET सांगितले की, परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी अनियमितता आणि गैरप्रकार आढळून आले होते. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळू नये म्हणून कठोर निर्णय घेण्यात आला. उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव विनीत जोशी यांनीही संसदीय समितीसमोर सांगितले की, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या शिफारशी लागू केल्या जात आहेत.सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन उपाययोजना राबवण्यावर भर दिला जात आहे. पेपरफुटी टाळण्यासाठी डिजिटल सुरक्षा, प्रश्नपत्रिका वितरणातील सुधारणा आणि देखरेख यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाला असून 21 जून रोजी पुन्हा NEET परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.