‘नीट’ पेपरफुटीचा पर्दाफाशतब्बल पाच राज्यांमध्ये विक्री

महाराष्ट्रात सर्वाधिक खरेदीदार

    दिनांक :22-May-2026
Total Views |
मुंबई 
NEET Paper Leak शभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या म्हणजेच सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेचा फुटलेला पेपर देशातील तब्बल पाच राज्यांमध्ये विकला गेला होता, आणि या पेपरची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी आणि त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व लॅपटॉप यांसारख्या डिजिटल गॅजेट्सच्या तांत्रिक तपासणीनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
 
neet paper leak 
NEET Paper Leak  तपासात समोर आले आहे की, या पेपरफुटीच्या सिंडिकेटला सर्वाधिक आर्थिक प्रतिसाद महाराष्ट—ातून मिळाला असून महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. ज्या पालकांनी आणि मध्यस्थांनी हा पेपर कोट्यवधी रुपये मोजून खरेदी केला, त्यांनी तो पुढे इतर विद्यार्थ्यांनाही विकल्याचे समोर येत आहे. पेपरफुटीची व्याप्ती वाढताना आता आणखी बडे मासे गळाला लागत असून लातूरमधील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्याकडून डॉ. शिरुरे यांनी आपल्या मुलासाठी लीक झालेली प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा संशय आहे. सीबीआयने त्यांना लातूरहून पुण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातही सीबीआयने मोठी कारवाई करत एका बहीण-भावाची कसून चौकशी केली असून, त्यांच्याकडून मोबाईल, सीम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची आई शिक्षिका असून, त्यांचीही या प्रकरणात चौकशी सुरू आहे.
NEET Paper Leak या आंतरराज्यीय रॅकेटचे पाळेमुळे खणून काढण्यासाठी सीबीआय आता कठोर पावले उचलत आहे. या प्रकरणात नाशिकमधून सर्वात आधी अटक करण्यात आलेला संशयित शुभम खैरनार, पुण्यातील बॉटनी शिक्षिका प्रा. मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या तिघांना समोरासमोर बसवून सीबीआय चौकशी करणार आहे. यामुळे हा पेपर नक्की कुठून आणि कोणाकोणाच्या माध्यमातून वितरित झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
NEET Paper Leak 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीमुळे पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आता 21 जून 2026 रोजी दुपारी 2:00 ते सायंकाळी 5:15 या वेळेत ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना 15 मे ते 21 मे 2026 पर्यंत परीक्षा केंद्र बदलण्याची मुदत देण्यात आली होती. ज्यांनी केंद्र बदलले नाही, त्यांचे जुनेच केंद्र कायम राहील आणि 21 मे नंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेचे शहर, प्रवेशपत्र आणि इतर तपशील 14 जून 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. या संपूर्ण गैरव्यवहारामुळे देशभरातील तब्बल 22 लाखांहून अधिक प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून, सीबीआय आता या व्यवहारात एकूण किती कोटींची उलाढाल झाली, याचा शोध घेत आहे.