झाडग्राम,
Pakistan Threatens Jhalmuri Vendor पश्चिम बंगालमधील झाडग्राम जिल्ह्यातील एका छोट्या दुकानदाराला अचानक मिळालेली प्रसिद्धी आता त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या हातची ‘झालमुडी’ खाल्ल्यानंतर हा दुकानदार सोशल मीडियावर चर्चेत आला होता. मात्र आता त्यालाच आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून धमकीचे फोन येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १९ एप्रिल रोजी घडली होती. झाडग्राम येथे निवडणूक सभेनंतर पंतप्रधान मोदी यांचा ताफा परतत असताना त्यांनी मोदींनी रस्त्याच्या कडेला ‘झालमुडी’ विकणाऱ्या बिक्रम साऊ यांच्या दुकानाजवळ थांबा घेतला. मोदी यांनी त्यांच्या हातची झालमुरी खाल्ली आणि काही वेळ त्यांच्याशी संवादही साधला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
या घटनेनंतर बिक्रम साऊ यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आणि ते स्थानिक स्तरावर चर्चेचा विषय बनले. मात्र, अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीनंतर आता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बिक्रम साऊ यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईलवर पाकिस्तान आणि बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून सतत कॉल आणि व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल येत आहेत. या कॉल्समधून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येणाऱ्या धमकीच्या कॉल्समुळे परिसरातही चिंता व्यक्त केली जात आहे.