पाकिस्तानचा वनडे संघ जाहीर, मोहम्मद रिझवानला वगळले

    दिनांक :22-May-2026
Total Views |
इस्लामाबाद
Pakistan's ODI Squad Announced पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या निवडीत सर्वात मोठा निर्णय म्हणजे अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यांना संघातून वगळण्यात आले आहे. टी-२० नंतर आता वनडे संघातूनही त्यांना बाहेर ठेवण्यात आले आहे.या संघात तीन नवोदित खेळाडूंना प्रथमच संधी देण्यात आली आहे. अहमद दानियाल, अराफत मिन्हास आणि रोहेल नझीर हे तिघे अद्याप पाकिस्तानकडून एकदिवसीय सामना खेळलेले नाहीत. त्यांच्या निवडीमुळे संघात नवे चेहरे दिसणार आहेत.
 
 

Pakistan 
 
कर्णधारपदाची जबाबदारी शाहीन शाह आफ्रिदीकडे सोपवण्यात आली आहे, तर सलमान अली आगा उपकर्णधार म्हणून संघात असेल. तसेच अनुभवी खेळाडू बाबर आझम, नसीम शाह, शादाब खान आणि सुफियान मुकीम यांना देखील संघात स्थान देण्यात आले आहे.फखर जमान आणि साईम अयुब यांना दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्यामुळे या मालिकेसाठी विचारात घेतले गेलेले नाही. तर उस्मान खान आजारपणामुळे संघातून बाहेर आहे. त्यांच्या अनुपस्थितीत मोहम्मद गाझी घोरी आणि रोहेल नझीर यांना यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. ही मालिका ३० मेपासून सुरू होणार आहे. पहिला सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होईल, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २ आणि ४ जून रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा संघ २३ मे रोजी इस्लामाबादमध्ये दाखल होणार असून ते रावळपिंडी येथे सराव सत्रांमध्ये सहभागी होतील.