छत्रपती संभाजीनगर
Prasad Lad छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेते तथा आमदार प्रसाद लाड यांना फोनवरून धमकी दिल्याच्या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी लाड हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी असताना त्यांना दोन ते तीन फोन कॉलद्वारे धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
लाड हे शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले असताना त्यांना “हॉटेलमध्ये घुसून मारू” अशी धमकी देण्यात आली. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्यावर पूर्वी केलेल्या टीकेचा संदर्भ देत ही धमकी दिल्याचेही बोलले जात आहे. या प्रकारानंतर हॉटेल परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास Prasad Lad करत पोलिसांनी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले या दोन तरुणांना अटक केली आहे. प्राथमिक तपासात या दोघांनीच धमकी दिल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, लाड ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.घटनेनंतर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. तेथे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. सरकारकडूनही जरांगे पाटील यांच्याशी संवाद सुरू असल्याचे मानले जात असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना लाड यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री उदय सामंत यांचा जरांगे पाटील यांच्याशी चांगला संवाद असल्याने सरकारकडून आवश्यक त्या वेळी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. धमकी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणांबाबतही त्यांनी संयमित भूमिका घेत, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची तयारी व्यक्त केली. तसेच या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई टाळावी, अशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.