राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

    दिनांक :22-May-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
Rajya Sabha Seats Election Schedule निवडणूक आयोगाने देशातील १० राज्यांमध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या एकूण २४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ जून ते जुलै या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना संपत असून त्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. आयोगाच्या माहितीनुसार, या द्विवार्षिक निवडणुकांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी करून निकालही जाहीर केला जाईल. निवडणूक आयोग १ जून रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून निश्चित करण्यात आली आहे.
 
 
 
Rajya Sabha Seats Election Schedule
आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येकी चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन जागांवर मतदान होईल. झारखंडमध्ये दोन जागांसाठी निवडणूक घेतली जाणार असून अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि मिझोराम या राज्यांमध्ये प्रत्येकी एक-एक जागेसाठी प्रक्रिया पार पडणार आहे.याचबरोबर निवडणूक आयोगाने दोन राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील दोन जागा रिक्त झाल्यामुळे ही निवडणूक घेतली जाणार आहे. महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांनी आमदार झाल्यानंतर राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत होता. तर तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे नेते सी. व्ही. षण्मुगम यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांचा कार्यकाळही २०२८ पर्यंत होता. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी यासाठी आयोगाने निरीक्षकांची नियुक्ती केली असून आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.