मंगळवार १९ मे रोजी दुपारच्या सुमारास येथील Robbery Outside the Bank भारतीय स्टेट बँकेसमोर घडलेल्या तब्बल ३ लाख १४ हजार रुपयांच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या तीन दिवसात छडा पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणात ३ विधी संघर्षग्रस्त बालकांना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, ओला ई-बाईक व मोबाईल असा एकूण २ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Robbery Outside the Bank माहितीनुसार, फिर्यादी अक्षय मोरे रा. बारीपुरा नांदगाव पेठ हे पेट्रोलपंपावर कॅश कलेक्शनचे काम करीत होते. त्यांनी मंगळवारी सावर्डी येथील पेट्रोलपंपावरून १ लाख ५५ हजार ७२० रुपये तसेच कोल्हटकर यांच्या डी. के. ट्रॅव्हलिंग पेट्रोलपंपावरून १ लाख ५८ हजार ४२० रुपये अशी एकूण ३ लाख १४ हजार १४० रुपयांची रोख रक्कम घेऊन बिझीलँड परिसरातील भारतीय स्टेट बँकेत भरण्यासाठी गेले होते. अक्षय याने वाहन पार्किंगमध्ये उभे करून ते बँकेकडे जात असताना मागून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी खिशातून घरगुती वापराचा चाकू काढून त्याच्यावर हल्ला केला. झटापटीत फिर्यादी किरकोळ जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या हातातील पैशांची बॅग जबरदस्ती हिसकावून घेतली व तेथून पळ काढला. पळून जाताना आरोपींपैकी एकाने हातातील चाकू घटनास्थळीच फेकून दिला व सर्व पसार झाले. पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ठाणेदार दिनेश दहातोंडे व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथक तातडीने मुंबईला रवाना करण्यात आले. अथक परिश्रम व शिताफीने पोलिसांनी या गुन्ह्यातील ३ विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे, पोउपनि गणेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल वैभव तिखिले, राजीक खान, शोएबुद्दीन सैयद, निलेश साविकार, चालक पोहेका वैभव धुरंदर तसेच गुन्हेशाखेचे सपोनि मनीष वाकोडे व पोलीस अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.