मुंबई
Rohit Shetty बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानावर झालेल्या गोळीबार प्रकरणाने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडवली होती. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात आता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या गोळीबाराच्या संपूर्ण कारवाईदरम्यान गँगस्टर अनमोल बिश्नोई व्हिडिओ कॉलद्वारे थेट संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोळीबार सुरू असताना तो शूटर्सच्या संपर्कात होता आणि संपूर्ण कारवाईवर तो लक्ष ठेवून असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. ही माहिती विशेष मकोका न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रातून समोर आली आहे.
या प्रकरणी दाखल करण्यात Rohit Shetty आलेल्या सुमारे 1,624 पानांच्या दोषारोपपत्रात असा दावा करण्यात आला आहे की, ही कारवाई पूर्वनियोजित होती आणि तिचा उद्देश दहशत निर्माण करणे तसेच टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा होता. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी प्रदीप कुमार याने गोळीबाराच्या सुमारे दहा दिवस आधीच रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण कारवाईदरम्यान अनमोल बिश्नोई मुख्य शूटरला सतत सूचना देत होता आणि मोहिम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सोशल मीडियाद्वारे जबाबदारी स्वीकारण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. संबंधित पोस्टमध्ये बॉलिवूडमधील काही व्यक्तींना धमकी देणारे संदेश देण्यात आल्याचा उल्लेख आहे.या संपूर्ण घटनेमुळे बॉलिवूड वर्तुळात सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दोषारोपपत्रातील आरोपांबाबत अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, पुढील सुनावणीत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.