भोंदूगिरीचा पर्दाफाश... ‘देव अंगात येतो’

    दिनांक :22-May-2026
Total Views |
सांगली
Sangli bhondugiri case जिल्ह्यात भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि नरबळीच्या भीतीचा वापर करून एका कुटुंबाची वर्षानुवर्षे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी ‘देव अंगात येतो’ असा बनाव रचून कुटुंबावर भीतीचे सावट निर्माण केले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण विटा परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Sangli bhondugiri case  
संकेत निकम, महेश बाबर आणि सूरज उपाध्याय या आरोपींनी स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवत पीडित कुटुंबाला सतत धमकावले. ‘तुमचा नवरा मरेल, मुलगी मरेल, वाईट शक्तींचा प्रभाव आहे, नरबळी दिल्याशिवाय संकट टळणार नाही’ अशा भीतीदायक विधानांद्वारे त्यांनी कुटुंबावर मानसिक दबाव टाकला. या भीतीच्या वातावरणाचा फायदा घेत आरोपींनी वेळोवेळी आर्थिक लूट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
 
 
या प्रकरणाची सुरुवातीला Sangli bhondugiri case तक्रार विटा पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती, मात्र त्यावेळी त्याकडे गंभीर दखल घेतली गेली नव्हती, असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यानंतर प्रकरण अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे गेल्यानंतर परिस्थितीला वेग आला. समितीचे कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे पुरावे गोळा करण्यात आले आणि पोलिसांशी सातत्याने संपर्क साधण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपानंतर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे आरोप नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
 
 
दरम्यान, या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचीही गंभीर माहिती समोर आली आहे. संबंधित मुलगी तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली असता तिला चक्कर आल्याने तातडीने पुढील कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही, अशीही माहिती मिळते. या प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे विटा परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या भोंदूगिरीच्या जाळ्याचा सखोल तपास केला जात आहे.