मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांच्या दालनात सरपंच संघटनेचा ३ तास ठिय्या

    दिनांक :22-May-2026
Total Views |
वर्धा, 
Sarpanch Association जिल्ह्यातील सन २०२४-२५ च्या कार्यकाळातील विद्यमान ३१५ सरपंचांची प्रशासक म्हणून नियुती करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर १५ मे ला ग्रामविकास विभागाकडून ३१५ सरपंचांची प्रशासक म्हणून नियुती करण्यात आदेश निघूनही अंमलबजावणी केली नसल्याने सरपंच संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांच्या दालनात आज २२ रोजी जवळपास ३ तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत आदेश निघणार नाही तोपर्यंत दालनातून हटनार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती. यावेळी प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी ससाड यांनी सोमवारपर्यंत आदेश काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
 
 
sarpanch
 
Sarpanch Association  वर्धा जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ मध्ये कार्यकाळ संपलेल्या ३१५ ग्रामपंचायतीच्या वतीने वर्धा जिल्हा सरपंच संघटनातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. १० एप्रिल रोजी सुनावणी दरम्यान न्यायालयाने २० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या परिपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन ३१५ सरपंचांची तात्काळ प्रशासक म्हणून नियुतीचे आदेश द्यावे या मागणीसाठी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर ४६ अंश तापमानात ४ दिवस बेमुदत उपोषण केले होते. १३ एप्रिलला मुंबई येथे अ‍ॅड. कारंजेकर यांनी ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग सचिव एकनाथ डवले यांना न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी विनंती अर्ज दिला होता. त्यांनी २० फेब्रुवारीच्या परिपत्रकानुसार पुर्वीच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना अधिकार बहाल केलेले असुन त्या संदर्भात ते निर्णय घेतील असे सांगितले होते. मुख्य कार्यपालन अधिकारी पराग सोमण यांनी आदेशासंबधी शासनाकडून मार्गदर्शक मागीतल्याचे सांगितले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे पत्र काढण्यात आले. मात्र, या पत्राची अंमलबजावणी मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांकडून करण्यात आली नसल्याने आजी माजी सरपंचोमध्ये रोष निर्माण झाला. प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी रसाड यांनी सोमवारपर्यंत आदेश काढण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर दालनात सरपंचांनी माघार घेतली. यावेळी सरपंच संघटनेचे संजय दुमणे, राजेश सावरकर, कीर्ती सवायी, अरुण सायंकार, संतोष सेलुकर, मुरलीधर चौधरी, विलास नवघरे, संगदीश संसारीया, बालू बोके, राजेश शिरघरे, विजय राऊत, विनोद वानखेडे, आदींसह जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे पदाधिकारी व विद्यमान सरपंच उपस्थित होते.