महाकाली येथे वैशाख अमावस्या व पंधरवाडी
वर्धा,
Shankar Prasad Agnihotri प्राचीन काळी सत्यवान आणि सावित्रीची कथा आजच्याही काळात तेवढीच समयसुचक आहे. सत्यावानाला आयुष्य कमी असल्याचेही माहिती असतानाही सावित्रीने सत्यवानासोबत विवाह केला. यमराज ठरलेल्या वेळी आपले काम करीत असताही सावित्री रडत बसली नाही. तिने यमराजाला चातुर्याने वर मागितला असल्याचे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. श्रीक्षेत्र महाकाली धामतीर्थ, महाकाली येथे वैशाख अमावस्या व पंधरवाडीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले की, प्राचीन काळी मद्र देशामध्ये अश्वपती नावाचा धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा राज्य करत होता. त्यांना ऐश्वर्य होते. पण एकच दुःख होते ते म्हणजे त्यांना अपत्य नव्हते. त्यामुळे ते दीर्घकाळ चिंतित होतेे. त्यांनी सावित्रीची उपासना केली. त्यांच्या भतीने प्रसन्न होऊन सावित्रीने त्यांना कन्या दिली. त्या कन्येचे नाव सावित्री ठेवले.
Shankar Prasad Agnihotri सावित्री मोठी होत गेली तशी तिच्या गुणांमध्ये अधिकच तेज दिसू लागले. तिच्या सौंदर्यापेक्षा तिचा विवेक, तिची नम्रता आणि तिचे आत्मबल अधिक प्रभावी होते. योग्य वेळी तिच्या विवाहाचा विचार सुरू झाला. तेव्हा सावित्रीने स्वतःच योग्य वर शोधण्यासाठी राजवाडा सोडला आणि ती अनेक देशांमध्ये फिरू लागली. अखेरीस तिला सत्यवान नावाचा युवक योग्य वाटला. सत्यवान हा राजा द्युमत्सेनाचा पुत्र होता; परंतु त्याचे कुटुंब राजवैभवापासून दूर गेले होते आणि वनात साधे जीवन जगत होते. सावित्रीने त्यालाच आपल्या पती म्हणून निवडले. मात्र, नारदाने सत्यवान गुणवान असला तरी त्याचे आयुष्य फार कमी असल्याचे सांगितले. हे ऐकून राजा अश्वपती चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी सावित्रीला दुसरा वर निवडण्याची विनंती केली. परंतु सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. सावित्री आणि सत्यवानांचा विवाह झाला. ती प्रतिदिन सत्यवानासोबत वनात जात असे, त्याच्या कामात मदत करत असे आणि सासू-सासर्यांची काळजी घेत असे. नारदांनी सांगितलेला दिवस जवळ आला. त्या दिवशी सत्यवान नेहमीप्रमाणे लाकूड तोडण्यासाठी वनात गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. वनात काम करत असताना सत्यवानाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. एका झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून बसला. काही क्षणांतच त्याचा प्राण शरीराबाहेर पडला. तेव्हा यमराज त्याचा जीव घेऊन जाऊ लागले. सावित्रीने जेव्हा यमराजांना सत्यवानाचा जीव घेऊन जाताना पाहिले, तेव्हा ती व्यथित झाली. तिने धैर्य एकवटले आणि यमराजांच्या मागे चालू लागली. सावित्री म्हणाली की पतीच्या मागे पत्नीचे जाणे हा धर्म आहे. तिचे शब्द अत्यंत संयत, पण प्रभावी होते. तिच्या बुद्धिमत्तेने यमराज प्रसन्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले.