हिंगणघाट,
hinganghat road accident वडनेर ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सगुणा कंपनीजवळ घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील रहिवासी गजानन मधुकर वानखेडे, पत्नी पल्लवी गजानन वानखेडे आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी आर्या गजानन वानखेडे हे जागोना येथील सासरवाडीतून आपल्या गावाकडे दुचाकीने परतत होते. सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान ते वडनेरकडून हिंगणघाटकडे येत असताना हा भीषण अपघात घडला.
राष्ट्रीय महामार्गावर समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या टिपर वाहनाने त्यांच्या एक्टिवा दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, गजानन वानखेडे, पल्लवी वानखेडे आणि लहानगी आर्या यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनाही तात्काळ कळविण्यात आले.hinganghat road accident हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुर्ला परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.