राष्ट्रसेवेला आयुष्य अर्पण करणाऱ्या रुक्मिणी अक्का यांचे निधन!
दिनांक :22-May-2026
Total Views |
बंगळुरू,
The Passing of Rukmini Akka राष्ट्र सेविका समितीच्या माजी अखिल भारतीय सहकार्यवाह रुक्मिणी अक्का यांचे बंगळुरू येथे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रसेवा, शिस्त आणि महिला संघटनासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या रुक्मिणी अक्का यांच्या जाण्याने एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. रुक्मिणी अक्का यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांमध्ये संघटन, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठी समर्पित केले होते. राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी देशभर प्रवास करत असंख्य सेविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, साधेपणा आणि आत्मीयता यांचा सुंदर संगम दिसून येत होता. रुक्मिणी अक्का या अनेक दशकांपासून स्वयंसेवक आणि सेविकांसाठी मातृसमान व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आणि अथक कार्याने हजारो कार्यकर्त्यांवर प्रभाव टाकला.
कुटुंबाची परंपरा शेवटपर्यंत जोपासली
रुक्मिणी अक्का या राष्ट्रसेवेची परंपरा जपणाऱ्या कुटुंबातून होत्या. त्या दिवंगत सूर्यनारायण राव यांच्या भगिनी होत्या, तर ज्येष्ठ संघ प्रचारक नरहरी यांच्याशीही त्यांचे निकटचे नाते होते. या कुटुंबाने संघ आणि समाजकार्यासाठी आयुष्य वाहिले असून रुक्मिणी अक्का यांनीही शेवटच्या श्वासापर्यंत ही परंपरा कायम ठेवली.त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे कठीण संघटनात्मक प्रश्नही शांतपणे आणि साधेपणाने सोडवण्याची क्षमता. समितीतील हजारो सेविकांसाठी त्या बहिणीसारख्या मार्गदर्शक होत्या.रुक्मिणी अक्का यांचे निधन ही राष्ट्र सेविका समितीसाठी मोठी हानी आहे जात आहे. त्यांचे शिस्तप्रिय, सेवाभावी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू.डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी रुक्मिणी अक्का यांचे जीवन राष्ट्रसेवा आणि संस्कारांचे तेजस्वी उदाहरण असल्याचे म्हटले.