*गुंजेवाही नजीकच्या जंगलात भयावह घटना
*एकाच कुटुंबातील दोन बहिनींचा समावेश
*13 जणांचा जीव होता धोक्यात
सिंदेवाही/चंद्रपूर,
Tiger Attack in Sindewahi चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वन परिक्षेत्रातील गुंजेवाही उपक्षेत्रांतर्गत येणार्या जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 13 पैकी 4 महिलांवर वाघाने हल्ला केला आणि त्यांना जागीच ठार केले. ही भयावह व धक्कादायक घटना शुक्रवार, 22 मे रोजी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील दोन बहिनींचा समावेश आहे. घटनेनंतर अवघे गुंजेवाही गाव शोकमग्न आहे. तर गावकर्यांमध्ये भिती तर आहेच. शिवाय तीव्र संतापाचे वातावरण आहे.
गुंजेवाही गावातील कवडाबाई दादाजी मोहुर्ले (45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (40), संगिता संतोष चौधरी (50), सुनिता कौशिक मोहुर्ले (38) या चारही महिलांना जोरदार हल्ला करीत वाघाने जागीच ठार केले. जवळपास 13 महिला सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास गुंजेवाही बिट कक्ष क्र. 1836 पी. एफ. मध्ये तेंदूची पाने गोळा करीत होत्या. तेव्हा अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. महिलांना जीवाच्या आकांताने गावाकडे धाव घेतली. मात्र, त्यातील चौघींवर काळाने घाला घातलाच.
या भीषण घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभाग आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्याने घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार-बोरावार, क्षेत्र सहायक पी. एस. मानकर, गुंजेवाहीचे वनरक्षक अमर गेडाम व अधिनिस्त परिक्षेत्रातील वनकर्मचारी व आरआरयु पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या पोठापाठ ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर., सहायक वनसंरक्षक एम. बी. गायकवाड, सहायक वनसंरक्षक अरविंद जे. हेही तेथे पोहोचले. सिंदेवाही पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीदेखील घटनास्थळी आले आणि त्यांनी गावकर्यांना समज दिली. त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
Tiger Attack in Sindewahi गेल्याच वर्षी याच सिंदेवाही तालुक्यात तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात तीन महिला जागेवरच ठार झाल्या होत्या. तर एक महिला गंभीर जखमी झाली. या सर्व महिला सिंदेवाहीजवळील मेंढा माल येथील होत्या. यातील शुभांगी चौधरी व कांता चौधरी यांच्यात सासूसूनेचे नाते होते. तर रेखा शेंडे या त्याच गावातील रहिवासी होत्या. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत होत नाही, तोच 22 मे रोजी आता वाघाच्याच हल्ल्यात चार महिला जागीच ठार झाल्या आहेत. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात 30 कॅमेरा ट्रॅप व 3 लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले असून, क्षेत्रीय कर्मचारी व विशेष पथकाद्वारे गस्त वाढविण्यात आली आहे. त्या परिसरात काही काळासाठी तेंदूपत्ता संकलन बंद करू. तसे संबंधित कंत्राटदाराला सूचना देऊ, अशी माहिती चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी तभाला दिली.
मृतकांच्या वारसांना आर्थिक मदत
मृतांच्या वारसदारांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 25 हजार रुपये असे एकूण 1 लाख रुपये रोखीने देण्यात आले. कवडाबाई दादाजी मोहुर्ले व अनुबाई दादाजी मोहुर्ले यांचे वारसदार भाऊ रमेश दादाजी मोहुर्ले यांना 50 हजार रुपये, संगीता संतोष चौधरी यांचे वारसदार पती संतोष आडकु चौधरी यांना 25 हजार रुपये तसेच सुनिता कौशिक मोहुर्ले यांचे वारसदार दीर चंद्रकांत सुधाकर मोहुर्ले यांना 25 हजार रुपये देण्यात आले आहे.
संतप्त गावकर्यांच्या मागण्या
ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरत, संबंधित वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात यावी, तेंदूपत्ता संकलनावेळी वन विभागाचे कर्मचारी सोबत असावेत, गावाभोवती नियमित गस्त वाढविण्यात यावी, जंगलात जाणार्या गावकर्यांना वन विभागाने सुरक्षा पुरवावी आदी मागण्या लावून धरल्या. परिस्थिती चिघळत असल्याचे बघून वन विभागाने आणि प्रशासनाने गावकर्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याची तयारी दर्शविली.
जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात 5 वर्षात 200 बळी
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने पेटत आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील 200 निष्पाप माणसांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर अवघ्या पाच महिन्यात 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यातील सर्वाधिक मृत्यू हे तेंदुपत्ता आणि मोहफुलांच्या मोसमातील आहेत. दरवर्षी या मोसमात 10 ते 15 माणसे मृत्युमुखी पडत असून, वनखात्याचा नियोजनावर वन्यजीव अभ्यासकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.