वर्धा/पुलगाव,
Trailer Accident in Pulgaon; ST Bus-Roller Collision in Wardha वर्धा जिल्ह्यात आज २२ मे शुक्रवार अपघातवार ठरला. हिंगणघाट येथे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. कोटेश्वर येथे एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पुलगाव नजिक ट्रेलरच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. वर्धा नागपूर मार्गावर वर्धे नजिक मामा भांजा मशिद जवळ बसच्या धडकेत रोड रोलरचे दोन तुकडे झाले. त्यामुळे एक बस चक शेतात उतरवल्या गेली. या अपघातात दोन जण जखमी झाले.
पुलगाव : वर्धा-पुलगाव मार्गावरील पुलगावलगत असलेल्या कॅम्प परिसरात दुपारी भीषण अपघात झाला. नागपूरकडून येणार्या एम ४० बीजी ९१५१ क्रमांकाच्या ट्रेलरने तवेरा वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रेलरचा कंटेनर थेट तवेरा गाडीवर कोसळल्याने ६० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले. अमरावती जिल्ह्यातील तळनी-निंभोरा येथील नागरिक हिरापूर-सालोड येथे अंत्यविधीसाठी जात होते. त्यावेळी पुलगावजवळ जवळ झालेल्या आशा अनिल केचे (६०) या महिलेचा मृत्यू झाला.
त्या पुलगाव नाचणगाव परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या अपघातात चेतन काडे, बेबी मधुकर जानोस्कर, मारोती जानोस्कर, वैशाली जानोस्कर आणि निर्मला जानोस्कर हे जखमी झाले असून त्यांच्यावर वर्धा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्धा : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पवनारजवळील मामा-भांजा दर्गा परिसरात आज दुपारी भरधाव एसटी बसने रोड रोलरला मागून जोरदार धडक दिल्याने रोलरचे दोन तुकडे झाले. या साखळी अपघातात पवनार येथील युवकासह बस चालक गंभीर जखमी झाले असून बसमधील आणखी काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
Trailer Accident in Pulgaon; ST Bus-Roller Collision in Wardha एमएच १४ एलएस ८९३९ क्रमांकाची एसटी बस नागपूरकडून नांदेडकडे जात होती. दरम्यान, मामा-भांजा दर्ग्याजवळ बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बसने समोरील रोड रोलरला मागून जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या दिशेने येणार्या एका चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा अंदाज चुकला आणि बस थेट रोड रोलरवर जाऊन आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की रोड रोलरचे दोन तुकडे झाले. याचवेळी पवनार येथील प्रीतम बोरकर (२६) हा दुचाकीने वर्धेकडे जात असताना या अपघातात सापडला. रोलरची धडक दुचाकीला बसल्याने प्रीतम बोरकर गंभीर जखमी झाला. अपघातात बस चालकालाही जबर मार लागला असून बसमधील चालकाच्या शेजारी बसलेले दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासह मदतकार्य केले.