भोपाळ,
Twisha's Second Post-mortem अभिनेत्री ट्विशा शर्मा प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण घडामोड घडली. मुख्य आरोपी समर्थ सिंग याच्या वकिलाने अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत असल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच, समर्थ सिंग कनिष्ठ न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले.या निर्णयानंतर न्यायालयात मुख्यत्वे दुसऱ्या शवविच्छेदनाच्या मागणीवर चर्चा झाली. प्रकरणाची गंभीरता आणि वेळेची निकड लक्षात घेऊन न्यायालयाने या मुद्द्यावर प्रथम सुनावणी घेण्याचे ठरवले.

सुनावणीदरम्यान दुसऱ्या शवविच्छेदनाच्या मागणीवर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले. ट्विशाच्या कुटुंबीयांच्या बाजूने दुसरे शवविच्छेदन आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूच्या वकिलांनी या मागणीला विरोध करत एम्सकडून करण्यात आलेले पहिले शवविच्छेदन पुरेसे असल्याचे सांगितले. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी डॉक्टरांच्या निष्पक्षतेवर विश्वास व्यक्त केला. मात्र, पीडित कुटुंबाला काही मुद्दे दुर्लक्षित झाल्याची भावना असल्यास दुसरे मत घेण्यास हरकत नसल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले.
सीबीआय चौकशी होणार
भोपाळमधील चर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासात पुरावे दडपले जात असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे निष्पक्ष तपास होणार नाही, अशी शंका व्यक्त करत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.मिळालेल्या माहितीनुसार, ट्विशाच्या सासरच्या मंडळीतील एका माजी जिल्हा न्यायाधीशांच्या प्रभावामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे देण्याचा निर्णय घेतला.