ठाणे
Thane shooting case उल्हासनगर कॅम्प 5 मधील कैलास कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैरातून दोन गट आमोरासमोर आले आणि त्यानंतर हा हिंसक प्रकार घडला. या गोळीबारात सुमारे सात राउंड फायरिंग झाल्याचे सांगितले जात आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गोळीबारात अनिल हरकेश चौहान आणि अमन चौहान यांचा मृत्यू झाला असून अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला सुरुवातीला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस घटनास्थळावरील Thane shooting case पुरावे गोळा करत असून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.