उमर खालिदला तीन दिवसांचा अंतरिम जामीन!

दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा

    दिनांक :22-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Umar Khalid granted interim bail ईशान्य दिल्ली दंगलीशी संबंधित यूएपीए प्रकरणात गेल्या साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असलेले जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते उमर खालिद यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारत त्यांना तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमर खालिद यांच्या आईवर मोठी शस्त्रक्रिया होणार असून त्या काळात त्यांच्या सोबत राहण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय दिला. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही कठोर अटीही घातल्या आहेत.
 
 

interim bail
 
न्यायालयाच्या आदेशानुसार, अंतरिम जामिनाच्या कालावधीत उमर खालिद यांनी दिल्लीतील त्यांच्या निश्चित पत्त्यावरच राहावे लागणार आहे. त्यांना केवळ रुग्णालयात जाऊन आईला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्यास किंवा कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच, सुटकेसाठी त्यांना १ लाख रुपयांचा जामीन सादर करावा लागणार आहे. न्यायालयाने त्यांना केवळ एकच मोबाईल क्रमांक वापरण्याची परवानगी दिली असून तो तपास यंत्रणेला देणे बंधनकारक राहणार आहे.
 
 
यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. कुटुंबातील इतर सदस्य आईची काळजी घेण्यासाठी उपलब्ध असल्याचे कारण देत अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर उमर खालिद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी, गंभीर शस्त्रक्रियेदरम्यान मुलाचे आईसोबत असणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. हा मुद्दा ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने मर्यादित कालावधीसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.