पुणे
Vikas Lavande पुणे येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या एका प्रकरणात विकास लवांडे यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वारकरी संप्रदायाविषयी कथित चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणामुळे शहरात राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपीकडून अधिक पुरावे मिळवणे आणि तपासाची दिशा स्पष्ट करणे या उद्देशाने ही मागणी करण्यात आली होती. सरकारी वकिलांनी न्यायालयात पोलिसांच्या वतीने जोरदार युक्तिवादही केला. मात्र, न्यायालयाने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावत थेट न्यायालयीन कोठडीचा निर्णय दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट या Vikas Lavande पक्षाचे प्रवक्ते म्हणून कार्यरत असलेल्या लवांडे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे त्यांची रवानगी कारागृहात होणार असून, आता पुढील चौकशी न्यायालयीन परवानगीच्या चौकटीतच करावी लागणार आहे.न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारल्याने तपास यंत्रणेला सध्या थेट चौकशी करता येणार नाही. पोलिसांना पुढील चौकशीसाठी आवश्यकता भासल्यास पुन्हा न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. या घडामोडीनंतर या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने पुढे जातो, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.