जबाबदारी घरच्यांची की शेजाऱ्यांची?

    दिनांक :22-May-2026
Total Views |
वेध
प्रफुल्ल व्यास
Jihadist drug आज भारत एका विचित्र वळणावर उभा आहे. एका बाजूला देश चंद्रावर पोहोचतो आहे, जगाला डिजिटल क्रांतीचे धडे देतो आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या तरुण पिढीच्या नसांमध्ये हळूहळू विष उतरते आहे. हे विष म्हणजे अमली पदार्थ. काही दिवसांपूर्वी दिल्लीत 182 कोटी रुपयांचा ‘कॅप्टागॉन’ नावाचा सिंथेटिक ड्रग पकडला गेला. या ड्रगला जगभरात ‘जिहादी ड्रग’ म्हणून ओळखले जाते. हा एका पिढीला आतून पोखरण्याचा, समाजाला कमकुवत करण्याचा आणि राष्ट्राच्या भवितव्यावर घाला घालण्याचा विषय आहे. युवकांना नशेचा आधार का घ्यावा वाटतो? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे. आज अनेक ठिकाणी सिगारेट, दारू, हुक्का, व्हेप्स, गोळ्या, पावडर या गोष्टी आधुनिकतेचे प्रतीक बनवल्या गेल्या आहेत. व्यसनाचा प्रवास मजेतून आणि शेवट मृत्यूने!
आज अनेक घरांमध्ये पैसा वाढला, पण संवाद कमी झाला. महागडे मोबाईल आले, पण मायेची दोन वाक्ये हरवली. संस्कारांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. पालक दिवसभर कामात व्यस्त आणि मुलं मोबाईलमध्ये! मुलगा अचानक एकटा राहू लागतो, चिडचिड करतो, रात्री उशिरा बाहेर राहतो, पैशांची मागणी वाढवतो.
 

जबाबदारी घरच्यांची की शेजाऱ्यांची? 
 
 
पण, अनेक पालक वय वाढते आहे म्हणून दुर्लक्ष करतात. जेव्हा वास्तव समोर येते, तेव्हा उशीर झालेला असतो. यात समाजाचाही मोठा दोष आहे. आजच्या तरुणावर प्रचंड ताण आहे. स्पर्धा, बेरोजगारी, अपयश, नात्यांमधील अस्थिरता आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकतो आहे. पैसे मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांचे ‘वॉर’ वाढले आहेत. त्यामुळे अनेक युवक आतून तुटत आहेत. एखाद्या देशाला कमजोर करायचे असेल तर त्याच्या तरुणाईला लक्ष्य केले जाते. कारण ज्यांच्या हातात उद्याचा भारत आहे, तेच जर नशेत बुडाले तर देशाच्या भविष्याचे काय? म्हणूनच हे फक्त पोलिस किंवा सरकारचे काम नाही. हा समाजाचा लढा आहे. पालकांनी जागे झाले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांनी फक्त गुणांची स्पर्धा न घेता जीवन जगण्याचे शिक्षण दिले पाहिजे. आज नशेला ‘ग्लॅमर’ मिळाले आहे. चित्रपट, वेब सीरिज, रील्स यामध्ये धूम्रपान, दारू, ड्रग्ज यांना स्टाईल समजले जाते. तिथे धूर सोडतो आणि टाळ्या मिळवतो. पण त्याच धुराने हजारो तरुणांचे आयुष्य जळते, हे कुणी दाखवत नाही. आज गरज आहे ती कठोर कारवाईसोबत सामाजिक जागृतीची. दिल्लीत सापडलेल्या ‘कॅप्टागॉन’सारख्या ड्रगला ‘जिहादी ड्रग’ म्हटले जाते. कारण जगातील अनेक तपास यंत्रणांनी याचा संबंध युद्धग्रस्त भागांशी, हिंसक नेटवर्कशी आणि तस्करीच्या साखळीशी जोडला आहे. हे ड्रग माणसाला कृत्रिम ऊर्जा देते, झोप कमी करते, भीती कमी करते आणि काही वेळासाठी बेफाम बनवते. म्हणजेच देवदत्त विचारशक्तीवरच हल्ला करते. त्यामुळे ड्रग माफियांना कोणतीही दया दाखवली जाऊ नये. कारण हे लोक पैशासाठी पिढ्या बरबाद करतात. आपण आपल्या मुलांना फक्त महागडे फोन देणार आहोत की मजबूत संस्कारही देणार आहोत? आपण त्यांना पार्टीची संस्कृती देणार का? आपण फक्त पैसे देऊन जबाबदारी संपवणार आहोत का? ड्रग्जची आग शहरातून गावाकडे, कॉलेजमधून शाळेकडे आणि बाहेरून घरात पोहोचली आहे. अजूनही आपण डोळे झाकून बसलो तर उद्या खूप उशीर झालेला असेल. आपण पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्य देत आहोत की विनाश? लक्षात ठेवा, सीमेवरचा शत्रू देशावर हल्ला करतो. पण, ड्रग्ज देशाच्या भविष्यावर हल्ला करतात.Jihadist drug कॅप्टागॉन हा एक सिंथेटिक स्टिम्युलंट ड्रग्ज आहे. 1960 च्या दशकात जर्मनीत फेनेथाइलीन तयार झाले. दिल्लीत जप्त केलेल्या 227.7 किलो कॅप्टागॉनची अंदाजे किंमत सुमारे 182 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या ड्रग्जची सुरुवात जर्मनी येथे झाली. 1960-70 च्या दशकात त्याचा वैद्यकीय वापर होता. नंतर उत्पादन बंद झाले, पण पुढे अवैध उत्पादन वाढत गेले. या ड्रगची तस्करी प्रामुख्याने सौदी अरब, जॉर्डन, यूएई, कुवैत, इराक, लेबनान अशा मध्य पूर्वेकडील देशांकडे होते; काही अहवालांमध्ये युरोपमध्येही तस्करी होत असल्याचे नमूद आहे. भारतातून पकडलेले ड्रग्ज मध्य पूर्वेकडे जाणार होते. या जिहादी ड्रग्जच्या अवैध वाहतुकीसाठी दिल्लीत सीरियन नागरिकाला अटक करण्यात आली. हा अमली पदार्थ कंटेनरमध्ये वेगळ्या मालाच्या नावाखाली पाठवत घरगुती सामानात लपवून पुढे नेण्याचा प्रयत्न होता. दिल्लीतील तपास यंत्रणेने हे ड्रग्ज पकडले असले तरी या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होते. पण, या गोष्टींना घरातूनच प्रतिबंध घालण्याची सुरुवात होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने काही परिवार बèयाचदा ओल्या पार्ट्यांमध्ये चीअर्स करीत असतात. अशा वेळी कोण कोणाला अडवणार आहे. तुम्ही चंगळ करणार आहात. पण, पुढची पिढी वाया जाते आहे, याची जाण घरच्यांनी ठेवायची की शेजाऱ्यांनी?
 
9881903765