महायुतीकडे करणार मागणी
अमरावती विधान परिषद निवडणूक
अमरावती,
Yuva Swabhiman Party अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्या कोअर कमेटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून युवा स्वाभिमान पार्टीला उमेदवारी देण्यात यावी, अशी ठाम मागणी कोअर कमेटीकडून करण्यात आली आहे. सुनील राणा याच्यांसह उपमहापौर सचिन भेंडे, डॉ. अविनाश चौधरी, संजय भारसाकळे यांनी कोअर कमेटीकडे निवेदन सादर करुन अधिकृतपणे उमेदवारी मिळण्याकरीता मागणी केली. अमरावती जिल्ह्यामध्ये युवा स्वाभिमान पार्टीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघर्ष केला असून ग्रामीण व शहरी भागात पक्षाची मजबूत संघटनात्मक ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत पक्षाला संधी देणे आवश्यक असल्याचे मत पदाधिकार्यांनी व्यक्त केले.
बैठकीमध्ये बोलताना पदाधिकार्यांनी सांगितले की, युवा स्वाभिमान पार्टी ही महायुतीची विश्वासू सहयोगी असून आगामी निवडणुकीत पक्षाला उमेदवारी दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण होईल आणि महायुतीला निश्चितच त्याचा फायदा होईल. तसेच अमरावती जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे प्रभावी संख्याबळ असून मतदारांमध्येही पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण असल्याचे सांगण्यात आले.
Yuva Swabhiman Party युवा स्वाभिमान पार्टीने कायम सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडले असून विकासाच्या मुद्यांवर सातत्याने भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये पक्षाला प्रतिनिधित्व मिळणे ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. बैठकीच्या शेवटी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या मागणीचा सकारात्मक विचार करून अमरावती विधान परिषद मतदारसंघ पक्षाला द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.