वैद्यकशास्त्रातील कोणतीही अधिकृत पदवी किंवा पदविका नसताना, थेट बंगालमधून येऊन महागाव तालुक्यातील ईजनी येथे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा भयंकर काळा धंदा एका 'Zholachap' doctor ‘झोलाछाप’ डॉक्टरने थाटला आहे. ‘आतिश’ नावाच्या या बोगस बंगाली डॉक्टरकडून दररोज शेकडो निष्पाप आणि भोळ्या-भाबड्या रुग्णांची सर्रास लूट सुरू आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण जीवघेण्या खेळावर महागाव तालुका आरोग्य विभागाची मेहेरनजर असल्याने, आरोग्य विभाग या बोगस डॉक्टरचा ‘दास’ बनला आहे का, असा संतप्त सवाल आता गावकरी विचारत आहेत.
महागाव तालुक्यातील ईजनी गावात ठाण मांडून बसलेल्या या आतिश नामक भोंदू डॉक्टरकडे कोणतीही वैध वैद्यकीय पदवी नाही, ना कोणती नोंदणी. तरीही कोणत्याही गंभीर आजारावर थेट उपचार करण्याचा आव हा डॉक्टर आणत आहे. गावातील गरीब आणि अशिक्षित जनता त्याच्या भूलथापांना बळी पडत आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राचा कोणताही गंध नसलेला हा इसम रुग्णांना हाय-डोस औषधे आणि इंजेक्शन देऊन त्यांच्या थेट जीवाशी खेळत आहे. उद्या जर एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण, असा थरकाप उडवणारा प्रश्न उपस्थित झाला आहे.
'Zholachap' doctor एकीकडे शासनाने बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना, महागाव तालुका आरोग्य विभाग मात्र या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. गावकरी तक्रारी करत असूनही आरोग्य विभागाचे अधिकारी कोणतीही कारवाई करायला तयार नाहीत. या बोगस डॉक्टरकडून आरोग्य विभागाच्या अधिकाèयांचे खिसे गरम केले जात आहेत का, असा थेट संशय आता नागरिकांमधून व्यक्त केला जाऊ लागला आहे. प्रशासनाने त्वरित या बोगस डॉक्टरच्या मुसक्या आवळून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.