चीनमध्ये खाण स्फोटात 8 जणांचा मृत्यू

    दिनांक :23-May-2026
Total Views |
बीजिंग,
8 Dead in Mine Explosion in China बीजिंगमध्ये मोठी दुर्घटना घडली असून चीनच्या उत्तरेकडील शानशी प्रांतातील एका कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 8 जणांचा मृत्यू झाला असून 38 मजूर अजूनही खाणीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना शानशी प्रांतातील चांगझी शहराजवळील लियुशेन्यू कोळसा खाणीत घडली. स्फोटाच्या वेळी खाणीत मोठ्या प्रमाणावर काम सुरू होते आणि एकूण सुमारे 247 मजूर आतमध्ये होते. स्फोटानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 201 मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे, तर उर्वरित मजुरांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
 
Explosion in China
 
चीनच्या अधिकृत वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर तातडीने तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला याची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेची गंभीर दखल घेत बचावकार्य वेगाने आणि पूर्ण ताकदीने राबवण्याचे आदेश दिले आहेत. अडकलेल्या मजुरांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. शानशी प्रांत हा चीनमधील प्रमुख कोळसा उत्पादक भाग मानला जातो. मोठ्या प्रमाणावर कोळसा उत्पादन होणाऱ्या या भागात अशा दुर्घटनांमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.