हुमणी अळी नियंत्रणासाठी मे महत्वाचा : डॉ. प्रमोद यादगिरवार

    दिनांक :23-May-2026
Total Views |
यवतमाळ,
Agricultural Scientist Dr. Pramod Yadgirwar सोयाबीन, ऊस, भुईमूग इत्यादी पिकांचे हुमणी अळी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मे महिना महत्वाचा असल्याचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. ही अळी वर्षभर पिकांचे नुकसान करते. हे नुकसान टाळण्यासाठी मे महिना महत्वाचा आहे. या काळात या किडीचा बंदोबस्त करणे सर्वात सोपे व प्रभावी असते. या अळीमुळे पिकांचे खरे नुकसान ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होत असले, तरी मे महिना हा जमिनीतील सुप्त अवस्थेतून प्रौढ भुंगेरे बाहेर पडण्याचा काळ असतो. वळवाचा पावसात प्रौढ म्हणजे भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन प्रजनन करतात. मे महिन्यात एक प्रौढ भुंगेरा मारल्यास 50 ते 70 किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालण्यापासून रोखता येते. मात्र एकदा का अंड्यातून अळ्या बाहेर पडल्या व पिकांच्या मुळांजवळ गेल्या, की त्यांच्यावर रासायनिक किंवा जैविक नियंत्रण करणे खूप अवघड आणि खर्चिक होते.
 
 
humni
 
Agricultural Scientist Dr. Pramod Yadgirwar  हिवाळा व उन्हाळ्यात भुंगेरे जमिनीत सुप्तावस्थेत राहतात. पहिल्या पावसानंतर भुंगेरे सूर्यास्तानंतर 7 ते 9 यावेळेत मोठ्या संख्येने जमिनीतून बाहेर येतात. म्हणून सर्व शेतकèयांनी दक्ष राहून मादी भुंगेरे अंडी घालण्यासाठी पुन्हा ओलसर जमिनीत जाण्याच्या आधी भुंगेरे नष्ट करावे, असे आवाहन डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी केले आहे. शेताच्या कडेला किंवा झाडांखाली हेक्टरी 1 ते 2 प्रकाश सापळे लावावेत. हे सापळे संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत सुरू ठेवावेत. सापळ्याच्या खाली रॉकेलमिश्रित पाण्याचे घमेले ठेवावे, जेणेकरून प्रकाशाकडे आकर्षित झालेले भुंगेरे त्यात पडून मरतील. प्रौढ भुंगेèयांना आकर्षित करण्यासाठी एकरी 3 कामगंध सापळे लावावेत. मान्सूनच्या सुरुवातीला मेटारायझियम अ‍ॅनिसोप्ली किंवा ब्युव्हेरिया बॅसिआना ही जैविक बुरशी 4 ते 5 किलो एकरी या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळावी. हे मिश्रण काही दिवस सावलीत ओलसर करून ठेवावे (जेणेकरून बुरशी वाढेल) आणि नंतर पिकाच्या मुळांजवळ टाकावे. जमिनीत ओलावा असताना इन्टोमोपॅथोजेनिक नेमॅटोड्स असे अळ्या खाणारे जंत मुळांजवळ टाकावेत. हे सुत्रकृमी जमिनीच्या आत जाऊन हुमणीच्या अळ्यांचा शोध घेऊन त्यांना मारतात. शिवाय शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक तत्त्वाचा वापर करावा, असे डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी सांगितले.