श्रद्धेच्या घरातच चोरीचा खेळ!

सेवेकऱ्यानेच दानपेटीवर मारला डल्ला

    दिनांक :23-May-2026
Total Views |
आळंदी (पुणे)
Alandi temple संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र आळंदी नगरीतील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दानपेटीतील रकमेच्या अफरातफरीचा प्रकार उघडकीस आला असून, मंदिरात सेवेकरी म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीनेच रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आळंदी देवस्थान संस्थानच्या आर्थिक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
 

Alandi temple theft case, Dnyaneshwar Maharaj temple donation box theft, 
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर महाराज मंदिरात हा प्रकार १२, १३ आणि १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत घडला. मंदिरात सेवेकरी म्हणून कार्यरत असलेला विशाल बाळू वारूळे (वय ३३) याच्याकडे दानपेटीतील रक्कम गोळा करून ती कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी होती. मात्र या जबाबदारीचा गैरफायदा घेत त्याने दानपेटीतील काही रक्कम स्वतःकडे वळवल्याचा आरोप आहे.
 
 
तपासात समोर आलेल्या Alandi temple माहितीनुसार, आरोपी दानपेटीतील पैसे बकेटमध्ये टाकण्याच्या प्रक्रियेदरम्यान सुरक्षा रक्षक आणि इतरांची नजर चुकवून काही रोकड स्वतःजवळील पिशवीत ठेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर तो ती रक्कम कॅशियरकडे जमा करण्यासाठी नेत असल्याचे भासवत होता. या पद्धतीने त्याने तीन दिवसांत प्रत्येकी सुमारे पाच हजार रुपये, अशी एकूण सुमारे १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मंदिरातील दानपेट्यांच्या सुरक्षिततेचा आणि आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.दरम्यान, या प्रकारानंतर भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही मंदिर परिसरात दानपेटी किंवा समाधीवरील रकमेबाबत गैरप्रकार झाल्याच्या चर्चा वारंवार समोर आल्या होत्या. मात्र त्यावर ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत संस्थानच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.दानपेटी मोजणी, सीसीटीव्ही देखरेख, स्वतंत्र लेखापरीक्षण आणि कर्मचाऱ्यांवर नियमित नियंत्रण या मूलभूत सुरक्षा यंत्रणांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अशा घटनांना वाव मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. श्रद्धेचे केंद्र असलेल्या आळंदीतील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.