मुंबई
Atal Setu मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने अटल सेतू (सेवरी–न्हावा शेवा) ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या 7.35 किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या जोडणीमुळे दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास ‘सिग्नल फ्री’ होणार असून प्रवास वेळेत लक्षणीय घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून, तो पूर्ण झाल्यानंतर अटल सेतू आणि मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग यांच्यात थेट, अखंड आणि उच्चगती संपर्क प्रस्थापित होणार आहे. सध्या या प्रकल्पात पायाभूत बांधकाम, खांब उभारणी आणि गर्डर बसविण्याचे काम मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे.उपलब्ध माहितीनुसार, एकूण 176 ठिकाणांपैकी 143 ठिकाणी पाया उभारणीचे काम पूर्ण झाले असून 141 ठिकाणी खांबांची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय 88 ठिकाणी पियर कॅप्सचे काम पूर्ण झाले आहे. प्री-कास्ट गर्डर बसविण्याचे कामही वेगाने सुरू असून एकूण 830 पैकी 653 गर्डर पूर्ण झाले आहेत. या प्रगतीमुळे प्रकल्पाची संरचनात्मक मजबुती लक्षणीयरीत्या वाढली आहे.
हा 6-लेन उन्नत Atal Setu कॉरिडॉर चिर्ले आणि पळस्पे मार्गे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाशी जोडला जाणार आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराशीही या मार्गामुळे अधिक सुलभ जोडणी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.या जोडणी प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासात 20 ते 30 मिनिटांपर्यंत वेळेची बचत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर प्रवास अधिक प्रवाही होऊन लॉजिस्टिक्स आणि आर्थिक व्यवहारांनाही गती मिळू शकते.सध्या या मार्गावर समांतर पातळीवर सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आणि इतर सहाय्यक कामे सुरू आहेत. हा प्रकल्प ‘मुंबई 3.0’ विकास आराखड्याचा महत्त्वाचा भाग मानला जात असून, 2027 पर्यंत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकल्पामुळे भविष्यात मुंबई–पुणे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून, दोन्ही शहरांमधील आर्थिक आणि सामाजिक संपर्क अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.