दुचाकीवरून जाताना वीज कोसळली, तरुण जागीच ठार

    दिनांक :23-May-2026
Total Views |
पुणे,
Bhore rain भोर शहरासह तालुक्याच्या विविध भागात शुक्रवारी (दि. २२) दुपारी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने परिसरात हाहाकार माजवला असून, वीज कोसळून एका २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Bhore rain  
सकाळपासूनच तालुक्यात प्रचंड उकाडा आणि ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास सुरू असलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः शेती पिकांवर या अवकाळी पावसाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
 
वादळी वाऱ्यामुळे Bhore rain  शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. प्रशासनाकडून नागरिकांना विजांच्या कडकडाटादरम्यान सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आणि झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या पावसादरम्यान झालेल्या दुर्घटनेत उत्रौली-कानवडी हद्दीतील परीटमाळ परिसरात दुचाकीवरून प्रवास करत असताना वीज कोसळून शंकर किसन काटेकर (वय २२, रा. वडगाव डाळ, ता. भोर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत चंद्रकांत गणपत वाघमारे (वय २६), अनिल रवी घोगरेकर (वय २३, दोघे रा. वडगाव डाळ) आणि सागर शांताराम पवार (वय २५) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
 
 
दरम्यान, आंबेगाव Bhore rain  तालुक्यातही शुक्रवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतातील तरकारी पिकांच्या सऱ्यांमध्ये पाणी साचले आहे. नव्याने लागवड केलेल्या तसेच वाढीच्या अवस्थेतील पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी साचल्याने शेतकऱ्यांना शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली.या अवकाळी पावसामुळे संपूर्ण परिसरात शेतीसह जनजीवन विस्कळीत झाले असून, पुढील काही दिवस हवामानातील अस्थिरतेमुळे आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.