मुंबई,
Cockroach Janata Party सोशल मीडियावर काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एक्स आणि इन्स्टाग्रामवरील अधिकृत अकाऊंट्स बंद झाल्यानंतर आता पक्षाची वेबसाईटही अचानक ऑफलाइन करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून पक्षात सहभागी होण्यासाठी नागरिकांकडून नोंदणी केली जात होती. मात्र, वेबसाईट बंद झाल्याने समर्थकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या पक्षाने अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली होती. अनेक तरुण या मोहिमेशी जोडले गेले होते.

विविध पोस्ट आणि व्हिडीओंमुळे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची राज्यभर चर्चा सुरू झाली होती. पण अचानक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाऊंट्स बंद होऊ लागल्यानंतर आता वेबसाईटही बंद झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घडामोडींमुळे संबंधित यंत्रणांकडून कारवाई सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावर काही समर्थकांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र, कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांशी आपला संबंध नसल्याचे पक्ष संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढील काही दिवस परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.‘कॉक्रोच जनता पार्टी’भोवती निर्माण झालेलं गूढ, सोशल मीडियावरील झपाट्याने वाढलेली लोकप्रियता आणि त्यानंतर झालेल्या सलग कारवायांमुळे हा विषय आता राज्यभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.