चीनच्या कोळसा खाणीत मरणाऱ्यांची संख्या 90 वर!

    दिनांक :23-May-2026
Total Views |
बीजिंग,
Death in Chinese coal mine चीनच्या शांक्सी प्रांतात एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 90 कामगारांचा मृत्यू झाला असून 9 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दशकातील चीनमधील ही सर्वात मोठी कोळसा खाण दुर्घटना मानली जात आहे. शुक्रवारी किनयुआन काउंटीमधील कोळसा खाणीत हा स्फोट झाला. दुर्घटनेच्या वेळी खाणीत सुमारे 247 कामगार काम करत होते. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटापूर्वी कार्बन मोनोऑक्साइड गॅसचा इशारा देण्यात आला होता. काही वेळातच जोरदार स्फोट झाला आणि खाणीत गोंधळ उडाला.
 
 
 
Death in Chinese coal mine
 
घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र मोठ्या संख्येने मजूर आत अडकले होते. आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून बेपत्ता कामगारांचा शोध अजूनही सुरू आहे.या दुर्घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेत बचाव मोहिमेला वेग देण्याचे आदेश दिले आहेत. बेपत्ता कामगारांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
 
शांक्सी प्रांत हा चीनमधील सर्वात मोठा कोळसा उत्पादक भाग मानला जातो. चीनने मागील काही वर्षांत खाणींच्या सुरक्षेत सुधारणा केल्याचा दावा केला असला तरी अशा दुर्घटना सतत समोर येत आहेत. यापूर्वी 2023 मध्ये मंगोलियातील खाण दुर्घटनेत 53 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर अलीकडेच शांक्सीतील दुसऱ्या एका खाण दुर्घटनेत चार जणांचा जीव गेला होता. दरम्यान, चीनमध्ये सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर आणि नैसर्गिक आपत्तींविरोधात अधिक सतर्क राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनीही बेपत्ता कामगारांचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.